ओठांवर जखम, डोक्यावर खुणा… गायक केकेच्या मृत्यूवरून सस्पेन्स वाढला

कोलकाता – प्रसिद्ध पार्श्वगायक कृष्णकुमारकुन्नथ (Krishnakumarkunnath) अर्थात के के यांचं कोलकत्त्यात एका मैफिलीनंतर निधन झालं. ते 53 वर्षांचे होते. त्यांनी हिंदी, तमिळ,तेलगु,कन्नड,मल्याळम तसंच मराठी, बंगाली, आसामी आणिगुजराथी भाषांमध्ये गाणी गायली आहेत. केके यांनी संगीताचं कोणतंही औपचारिक शिक्षण घेतलं नव्हतं.

दरम्यान, गायक केके यांच्या निधनाबाबत कोलकातामध्ये सस्पेंस वाढला आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या कपाळावर आणि ओठांवर जखमेच्या खुणा आढळून आल्या आहेत. यानंतर पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची (Unnatural death) नोंद केली आहे. पोलिस केकेच्या मृत्यूप्रकरणी आयोजक आणि हॉटेल कर्मचाऱ्यांची चौकशी केली जात आहे. हा कार्यक्रम गुरुदास महाविद्यालयात (Gurudas College) आयोजित करण्यात आला होता.

इकडे गायक केकेचे कुटुंब कोलकात्यात आले आहे. त्यांचा मृतदेह सध्या सीएमआरआय रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. येथून त्यांचे पार्थिव एसएसकेएम रुग्णालयात नेण्यात येणार आहे. तर, याप्रकरणी नवीन मार्केट पोलिस ठाण्यात अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संगीतकाराचा मृत्यू शारिरीक आजाराने झाला की अन्य कोणत्या कारणाने झाला याचा तपास पोलीस करत आहेत.

गायक केके यांच्या निधनावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बंगाल भाजपचे माजी अध्यक्ष दिलीप घोष (Dilip Ghosh) यांनी राज्य सरकारला सवाल केला आहे. ज्या पद्धतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला तो योग्य नाही, याची चौकशी झाली पाहिजे, असे ते म्हणाले. दिलीप घोष पुढे म्हणाले की एसीशिवाय आणि एवढ्या गर्दीत कसे काम करावे लागले. क्षमतेपेक्षा जास्त गर्दी असल्याने एसी बंद असल्याचे त्यांनी सांगितले. या कारणामुळे त्यांची तब्येत बिघडली की काय, हे माहीत नाही, लोकांमध्ये खळबळ उडाली आहे.