Hardik Pandya | ‘हार्दिक पांड्याला कर्णधार बनवणे…’ मुंबई इंडियन्सच्या माजी कर्णधाराचं धक्कादायक वक्तव्य

Hardik Pandya | मुंबई इंडियन्स संघाला त्यांची आयपीएल 2024 मधील कामगिरी कधीच लक्षात ठेवायची नाही. हंगामापूर्वीच मुंबई इंडियन्स वादाच्या भोवऱ्यात सापडली होती आणि त्याचा परिणाम त्यांच्या निकालावर दिसून आला. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स आयपीएल 2024 च्या गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे. संघाने 14 सामन्यांत केवळ 4 विजय नोंदवले तर 10 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला.

भारतीय संघाचा माजी ऑफस्पिनर हरभजन सिंगने (Harbhajan Singh) आयपीएल 2024 मधील मुंबई इंडियन्सच्या कामगिरीचा आढावा घेताना मोठा खुलासा केला आहे. हरभजन सिंगही 10 वर्षे मुंबई इंडियन्सचा भाग होता. हार्दिक पंड्याला कर्णधार बनवण्याचा संघ व्यवस्थापनाचा निर्णय चुकीचा ठरल्याचे त्याने सांगितले.

काय म्हणाला हरभजन सिंग?
एएनआयशी बोलताना भज्जी म्हणाला, “मी 10 वर्षे मुंबई इंडियन्सकडून खेळलो. संघ व्यवस्थापन हुशार आहे, पण या निर्णयाचा त्यांच्यावर उलटसुलट परिणाम झाला. हार्दिक पांड्याला कर्णधार बनवून व्यवस्थापनाने भविष्याचा विचार केला, पण तो संघाला बसला नाही.”

वाट पाहू शकलो असतो
हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) कर्णधार बनवण्याची वेळ योग्य नसल्याचेही हरभजन सिंगने म्हटले आहे. यासाठी संघ व्यवस्थापन पुढील वर्षापर्यंत वाट पाहू शकले असते. तो म्हणाला, “संघ खेळत असताना असे वाटत होते की कर्णधार वेगळा खेळत आहे आणि संपूर्ण संघ वेगळा खेळत आहे. माझ्या मते, हार्दिक पांड्याला कर्णधार बनवण्याची वेळ योग्य नव्हती. कदाचित वर्षभरानंतर हा निर्णय घेता आला असता.”

भज्जीने पंड्याला साथ दिली
39 वर्षीय हरभजन सिंगने हार्दिक पांड्याचा बचाव केला. माजी ऑफस्पिनर म्हणाला, “हार्दिक पंड्याचा दोष नव्हता कारण तो गुजरात टायटन्सचा कर्णधारही होता. संघ एकसंध खेळला नाही आणि संघात एकसंध राहून सांघिक वातावरण चांगले राहील याची काळजी वरिष्ठ खेळाडूंनी घ्यायला हवी होती.”

वाद काय होता
आयपीएल 2024 सीझनपूर्वी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला हटवून हार्दिक पांड्याला कर्णधार बनवले होते. रोहित शर्माने त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईला 5 वेळा आयपीएल चॅम्पियन बनवले आणि त्याला अचानक कर्णधारपदावरून हटवण्याचा निर्णय चाहत्यांना आवडला नाही. हार्दिक पांड्याला चाहत्यांच्या तीव्र टीकेला सामोरे जावे लागले आणि चालू हंगामातील संघाची कामगिरी अत्यंत निराशाजनक होती.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप