मोदीजी, सत्तेत येऊन 8 वर्षे झाली, दरवर्षी 2 कोटी नोकऱ्यांचं काय झालं ?

वाशीम – पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत येऊन 8 वर्षे झाली आहेत. त्यांनी दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या देण्याचं आश्वासन देऊन देशातील तरुणांची फसवणूक केली आहे.देशातील तरूण मोदींना नोकऱ्या कुठे आहेत, असा सवाल विचारत आहेत, पण मोदी गप्प आहेत, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे.सामान्य जनता, शेतकरी, कष्टकरी यांच्याशी मोदी सरकारला काहीही देणंघेणं नाही, असा घणाघात राहुल गांधी यांनी केला.

भारत जोडो यात्रेदरम्यान वाशिम येथील चौक सभेत राहुल गांधी बोलत होते.ते म्हणाले, देशातील तरुणांना रोजगार मिळण्याऐवजी उलट चुकीच्या पद्धतीने GST, नोटबंदी यांच्यामुळे उद्योग बंद पाडून लोकांचे रोजगार घालवण्यात आले आहेत. देशाचा कणा असलेले लघु, मध्यम, छोटे व्यापार दुकानदार यांचे व्यवसाय बंद पडले आहेत.केवळ दोन-तीन उद्योगपतींसाठी मोदी सरकार काम करतं. गॅस 40 रुपये, पेट्रोल 70 रुपये आणि डिझेल 60 रुपये असताना नरेंद्र मोदी UPA सरकारवर कठोर टीका करत होते.आता गॅस 1200 रुपये, पेट्रोल 109 रुपये आणि डिझेल 96 रुपये झाले तरी नरेंद्र मोदी एकही शब्द उच्चारत नाहीत.