mosquitoes | डासांची उत्पत्ती रोखुया, हिवतापाचे निर्मुलन करूया

mosquitoes | दरवर्षी जून महिना हा ‘हिवताप प्रतिबंध महिना’ म्हणून पाळला जातो. किटकजन्य आजारांमुळे दरवर्षी अनेकांना जीव गमवावा लागतो. हिवताप, डेंग्यू, चिकनगुन्या, हत्तीरोगसारखे आजार डास चावल्यामुळे होतात. असे जीवघेणे आजारांपासून दूर राहण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या परिसरात, घरात डासांची निर्मिती होवू नये म्हणून विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

किटकजन्य आजारांचा प्रसार करणाऱ्या डासांची उत्पत्ती साचलेल्या पाण्यात होत असते. डास (mosquitoes) हा साचलेल्या पाण्यात अंडी घालतो. ८ ते १० दिवसात नवीन डास जन्माला येतो. हा डास आजारी व्यक्तीला (रुग्णास) चावल्यास रुग्णाच्या शरीरातील जंतू डासाच्या शरीरात जातात. तेथे त्यांची वाढ होते व त्यानंतर हा असा दूषित डास ज्या निरोगी व्यक्तींना चावेल त्यांना डेंग्यू, चिकनगुन्या व हत्तीरोग यासारखे आजार होतात.

हिवतापाची लक्षणे:
थंडी वाजून ताप येणे हे हिवतापाचे लक्षण आहे. ताप हा सततचा असू शकतो किंवा एक दिवसाआड येऊ शकतो. नंतर घाम येवून अंग गार पडते. ताप आल्यानंतर डोके दुखते व बऱ्याच वेळा उलट्याही होतात.

डास आणि त्यांच्या उत्पत्तींची ठिकाणे:
ॲनॉफिलीस डास हा हिवतापाचा प्रसार करतो. त्याची उत्पत्ती नदी, नाले, विहिरी व तळी याठिकाणच्या स्वच्छ पाणीसाठ्यांमध्ये होते. एडिस एजिप्ती हा डास डेंग्यू आणि चिकनगुन्या या आजारांचा प्रसार करतो. त्याची उत्पत्ती ही घरगुती पाण्याच्या टाक्या, बॅरल, रांजण, हौद, फुटके डबे, निरूपयोगी साठविलेले पाणी, घरातील कुलर, फ्रिजच्या डीप ट्रे मधील पाणी, मनी प्लॅन्ट मधील पाणी इत्यादी स्वच्छ पाण्यासाठ्यामध्ये होते. क्यूलेक्स डास हा हत्तीरोगाचा प्रसार करतो. त्याची उत्पत्ती शौचालयाचा सेप्टिक टँक, तुंबलेली गटारे व पाण्याची डबके या अस्वच्छ पाणीसाठ्यात होते.

अशी घ्यावी दक्षता:
ताप आल्यास त्वरीत डॉक्टरकडे जावे. डॉक्टरच्या सल्ल्याप्रमाणे आवश्यक चाचण्या कराव्यात. शासकीय रुग्णालयात यासाठी मोफत औषधोपचार उपलब्ध आहेत. झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा. पूर्ण अंग झाकले जाईल असे कपडे वापरावेत. डासांपासून संरक्षणासाठी घराच्या दारे, खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात. क्रीम, मॅट, कॉईलचा वापर करावा.

डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी करा उपाययोजना:
घराच्या शौचालयाच्या सेप्टीक टँकच्या व्हेन्ट पाईपला (गॅस पाईप) जाळी बसवावी अथवा कापड बांधावे यामुळे डासांची उत्पत्ती रोखली जाते. घर आणि परिसरात स्वच्छता ठेवावी. सेप्टीक टँकचे ढापे सिलबंध ठेवावेत. गच्चीवरील पाण्याच्या टाक्यांना घट्ट झाकण बसवावीत. घरातील पाण्याच्या टाक्या, रांजण, बॅरल, हौद हे आठवड्यातून किमान एकदा घासून पुसून स्वच्छ करावेत व ते घट्ट झाकनाने आणि कापडाने नेहमी झाकून ठेवावेत. घरातील, गच्चीवरील, घराच्या परिसरातील भंगार सामान, फुटके डबे, वस्तू, निरूपयोगी टायर यांची विल्हेवाट लावावी. या ठिकाणी पावसाचे पाणी साठून डासांची उत्पत्ती होते. घरातील कुलर, मनी प्लॉट, चायनीज प्लॉटमधील पाणी आठवड्यातून किमान एकदा बदलून स्वच्छ करून पुन्हा भरावे. फ्रीजच्या ट्रेमधील पाणी वेळोवेळी काढून टाकावे. गच्चीवर अंगणात घराच्या परिसरात कोठेही पाणी साचणार नाही, याची दक्षता घ्यावी.

अपर्णा पाटील, जिल्हा हिवताप अधिकारी, पुणे- सन २०२७ पर्यंत हिवताप निर्मुलन व शून्य हिवताप रुग्ण हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हिवताप निर्मूलन कार्यक्रम नागरिकांच्या सहभागाने राबविण्यात येणार आहे. हिवताप प्रतिबंध महिना राबवित असताना नागरिकांना हिवताप प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे महत्व पटवून देण्यात येणार आहे. ‘डासांची उत्पत्ती रोखूया, हिवतापाचे निर्मूलन करूया’ हे ब्रीदवाक्य प्रत्यक्षात आणण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी या अभियानात सक्रीय सहभाग नोंदवावा.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप