छत्रपती शिवाजी महाराज हे स्वयंभु राजे; त्यांना गुरुची आवश्यकता नव्हती – रामदास आठवले

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज हे स्वयंभू राजे होते. शौर्य आणि धैर्याचे महामेरू होते. त्यांना गुरूची गरज नव्हती. त्यांच्या खऱ्या गुरू माता जिजाऊ याच होत्या. अन्य कोणी त्यांचा गुरू होऊ शकत नाही. असे स्पष्ट प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे वक्तव्य केले आहे ते मला माहित नाही त्याबाबत मी लवकरच राज्यपाल यांना भेटून माझे मत सांगणार आहे. समर्थ रामदास स्वामी यांचे स्थान त्यांच्या जागी आहे. मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांना कोणत्याही गुरू ची आवश्यकता नव्हती. ते स्वयंभू राजे होते. संपूर्ण देशात छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानले जात आहे. असे रामदास आठवले म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज हे समतेचे तत्व जगणारे राजे होते.त्यांनी सर्व जाती धर्माच्या मावळ्यांना एकत्र करून हिंदवी स्वराज्य उभारले. त्यांचा छत्रपती म्हणून राज्याभिषेक करण्यास महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी नकार दिला त्यानंतर काशी हुन आलेल्या गगभट्टानी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केल्याचा इतिहास सर्वश्रुत आहे असे रामदास आठवले यांनी आज मुंबईतून प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

तसेच युक्रेन मध्ये अडकलेल्या भारतीयांना देशात परत आणण्यासाठी केंद्र सरकार युद्ध पातळीवर काम करीत आहे याबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केवळ टीका करू नये. सरकार ला सूचना जरूर कराव्यात. एका भारतीय विद्यार्थ्याचा युक्रेन मध्ये मृत्यू झाला ही दुःखद बाब आहे असे रामदास आठवले म्हणाले.