Sushma Andhare | “दोन्ही समाजाला खेळवण्याचं पाप सत्ताधाऱ्यांनी करु नये”, ओबीसी शिष्ठमंडळाच्या बैठकीवरुन सुषमा अंधारेंचा निशाणा

Sushma Andhare | मागील ९ दिवसांपासून ओबीसी आरक्षणासाठी लक्ष्मण हाके हे जालन्यातील वडीगोद्री गावामध्ये उपोषणाला बसले आहेत. आता राज्य सरकारने त्यांच्या उपोषणाची दखल घेतली असून काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ओबीसी नेत्यांची बैठक सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. दरम्यान या बैठकीवरुन शिवसेना उबाठा गटाच्या महिला उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

मराठा आंदोलन असेल किंवा ओबीसी आंदोलन असेल दोन्ही समाजाला खेळवण्याचं पाप सत्ताधाऱ्यांनी करु नये, असा सल्ला सुषमा अंधारे यांनी दिला. त्या म्हणाल्या, मराठा आणि ओबीसी समाजाला खेळवण्याचं पाप करु नये. कारण सत्ताधारी मनोज जरांगेंना जाऊन भेटतात आणि सांगतात की तुमच्या मागण्या पूर्ण करणार आहोत. तेच सत्ताधारी ओबीसी आंदोलकांना सांगत आहेत की तुमच्याही मागण्या पूर्ण होतील. एकाच म्यानेत दोन तलवारी कशा राहू शकतील? मला वाटतं की सरकारची नियत चांगली असेल तसंच जाती-धर्माचं ध्रुवीकरण करायचं नसेल तर मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलक यांना समोरासमोर बसवावं. त्यांची एकत्रित बैठक घेऊन समन्वयाने मार्ग शोधला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप