राष्ट्रवादीच्या त्या ९ मंत्र्यांना अद्याप खातेवाटप नाही; भाजप आणि शिंदे गटातील तणाव कारणीभूत?

मुंबई -: आठवडाभरापूर्वी शपथविधी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस मधील त्या नऊ मंत्र्यांना अद्याप खातेवाटप झाले नसण्यामागे भाजप आणि शिंदे गटातील अंतर्गत तणाव कारणीभूत आहे. खातेवाटपाला होत असलेला उशीर हे शिंदे गट – भाजप यांच्यातील तणावाचे संकेत आहेत आणि भाजपने केवळ राजकीय फायद्यासाठी राष्ट्रवादी फोडली असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी केला आहे.

मुंबईत आज माध्यमांशी संवाद साधताना महेश तपासे यांनी राष्ट्रवादी मधून गेलेले ९ आमदार ज्यांना मंत्रिपद मिळाले ,त्यांच्यासह जे शिंदे यांच्यावर निष्ठा ठेवून सत्तेत गेले आणि भाजप मधील जे जुने निष्ठावंत आहेत त्यांना मंत्रिपद आणि त्यांचे देखील खातेवाटप केव्हा होणार असा प्रश्न आता निर्माण झाल्याचं तपासे यांनी म्हटलं आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळातील उदाहरण देत तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) सेनेच्या आमदारांना निधी देत नाही म्हणून आम्ही भाजपसोबत गेलो असे म्हणणारे एकनाथ शिंदे आता त्याच राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सत्तेत आहेत त्यामुळे आता नैतिकतेचा कोणता आधार ते घेणार असा सवाल देखील तपासे यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना केला आहे.

दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या आजच्या अमरावती दौऱ्या निमित्त ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी लावलेले बॅनर्स आणि होर्डिंग खा. नवनीत राणा यांच्या समर्थकांनी फाडल्याच्या आरोपांबाबत बोलताना बॅनर आणि होर्डिंग्ज फाडून काही साध्य होत नाही. हनुमान चालीसाच्या नावाखाली केवळ प्रसिद्धी मिळवायची हे काम त्यांना राहिले आहे .कर्नाटक मध्ये ज्या पद्धतीने भाजपच्या डोक्यावर हनुमानाची गदा पडली त्याप्रमाणे महाराष्ट्रात देखील भाजपच्या डोक्यावर हनुमानाची गदा पडणार आहे असा टोला यावेळी तपासे यांनी विरोधकांना लगावला.

यावेळी मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून शरद पवार यांनी सेनेला भाजपपासून दूर केल्याचं जे विधान केलं त्या वर बोलताना भुजबळ यांच्या आरोपात तथ्य नसल्याचे तपासे म्हणाले. सेना आणि भाजप यांच्यात २०१९ साली मुख्यमंत्री पदावरून अंतर्गत वाद झाले होते . जनतेचे हाल होऊ नयेत या दृष्टिकोनातून महाविकास आघाडीचे सरकार आणण्यासाठी शरद पवार यांनी प्रयत्न केले होते आणि अडीच वर्ष ते सरकार चांगल्या स्थितीत चाललं असंच स्पष्ट करण राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता महेश तपासे यांनी यावेळी दिले.