गोदावरी स्वच्छ झाल्याशिवाय नाशिकला नाशिकपन येणार नाही –  छगन भुजबळ

नाशिक  :- नाशिकची मुख्य ओळख ही  गोदावरी (Godavari river) असून ती अतिशय स्वच्छ राहिली पाहिजे. नदीच नदीपन आपण जपलं पाहिजे ती गटार होता कामा नये याची दखल सर्वांनी घ्यावी. नाशिक शहर स्मार्ट (Smart City)करायचे असेल तर गोदावरी स्वच्छ झाल्याशिवाय ती स्मार्ट होणार नाही. जेव्हा गोदावरी नदीला जोडणारी गटार बंद होतील तेव्हाच नाशिकचं नाशिकपण मिळेल असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ  (Chagan bhujabal) यांनी केले.

नाशिकच्या परशुराम सायखेडा नाट्यगृह येथे जैन सेवा कार्य समिती, नाशिक यांच्यावतीने भगवान महावीर जन्म कल्याण सोहळ्या निमित्ताने आयोजित वाख्यान मालेत मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक काल आज आणि उद्या या विषयावर संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री शोभाताई बच्छाव, माजी आमदार अनिल कदम, जैन सेवा कार्य समितीचे अध्यक्ष गौतम सुराणा, मोहनलाल चोपडा, सुमेरकुमार काले, मोहनलाल चोपडा, अशोक साखला, सुभाष लुणावत, सुनील बुरड, सुभाष लुणावत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी नाशिक काल आज आणि उद्या या विषयावर संवाद साधताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, नाशिक हे सकाळी भोंग्याच्या आवाजाने सुरू व्हावयच आणि रात्री पुन्हा भोंगा व्हायचा मात्र आता वेगळेच भोंगे(Loudspeaker) वाजविले जाताय अशी मिश्किल टिपणी त्यांनी यावेळी केली. ते म्हणाले की, सद्या वैचारिक भ्रष्टाचार अधिक वाढला असून सत्ता हवी म्हणून कुठलेही मार्ग अवलंबिण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही बाब अतिशय दुर्दैवी आहे. यातून काहीच सादय होईल असे वाटत नाही कारण एकाच धर्माची राष्ट्र एकमेकांमध्ये भांडत आहे. जगात सध्या सगळीकडे हिंसा सुरू आहे. भगवान महावीर यांनी जगाला शांततेचा संदेश दिला. भगवान महावीर यांची शिकवण कठीण असली तरी ती आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा असे त्यांनी यावेळी सांगितले.

ते म्हणाले की, पूर्वी गोदावरी नदी अतिशय स्वच्छ वाहत होती. लोक स्नान करत होते, पाणी पीत होते, जगभरातील लोक याठिकाणी बघण्यासाठी येत होते. मात्र सद्याची परिस्थिती बदलली असून गोदावरी अतिशय प्रदूषित झाली आहे. त्यामुळे भाविकांना या नदीत स्नान करणे देखील अवघड झाले आहे. नाशिकची ओळख मंत्रभूमी अशी होती आता ती ओळख तंत्रभूमी आणि यंत्रभूमी देखील बनली आहे. शहरांचा विकास होत असताना सर्व प्रकारचे प्रदूषण वाढत आहे. हा चिंतेचा विषय आहे. विज्ञान जसे पुढे जाईल तश्या नवीन गोष्टी पुढे येतील त्याला आपला विरोध नाही. मात्र त्याचा वापर करतांना आवश्यक ती काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, सन २००४ साली येवल्यातून निवडून आल्यानंतर मुंबई पुण्याच्या धर्तीवर नाशिकचा विकास व्हावा यासाठी प्रयत्न केले. सर्व प्रथम मुंबई नाशिक रस्त्यांचे काम हाती घेतलं. त्यानंतर जिल्ह्यात रस्त्याचे जाळ निर्माण करत नाशिक शहरात भव्य असा उड्डाणपूल निर्माण केला. या शहराला जोडण्यासाठी आतील आणि बाहेरील रिंग रोडचे जाळ निर्माण करत वाहतुकीचा प्रश्न सोडविला. त्र्यंबकेश्वर नाशिकला जोडणारा हिरवा चौपदरी रस्ता विकसित केला आज याठिकाणी उच्च दर्जाचे हॉटेलस निर्माण झाल्या असून जगभरातील पर्यटक याठिकाणी येत असल्याचे त्यांनी सांगितले.