‘मातोश्री दूर राहिलं, एखाद्या शाखा प्रमुखाच्या घरासमोर जाऊन त्यांनी हनुमान चालिसा म्हणून दाखवावी’

मुंबई – राज्यात अनेक महत्वाचे मुद्दे असताना अचानकपणे भोंग्यांचा मुद्दा सत्ताधारी आणि विरोधक लावून दिसत असल्याचे चित्र आहे. नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांच्या निवासस्थानी हनुमान चालिसाचे पठण करावे, अन्यथा मी आणि खासदार नवनीत राणा मातोश्रीवर हनुमान चालिसाचे (Hanuman Chalisa) पठण करू, असा इशारा आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी दिला होता. यानंतर शिवसेना (Shivsena) चांगलीच आक्रमक झाली आहे.

राणा दांपत्याचा अमरावतीमधील गंगा सावित्री या निवासस्थानासमोर हजारोंच्या संख्येने शिवसैनिक जमले होते. मात्र पोलिसांनी त्यांना आधीच अडवले. दरम्यान यातच आता शिवसेना नेते आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री उदय सामंत (Uday samant) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना जाहीर आव्हान दिलं आहे.

मुख्यमंत्र्यांवर बोलणं ही सध्या फॅशन झाली आहे. त्याच्यामुळे टीआरपी वाढतो आणि प्रसारमाध्यमंदेखील त्यांच्या मुलाखती घेतात. ज्यांचं अस्तित्व नष्ट झालं आहे, जे अनेक पक्ष फिरुन आले आहेत त्यांना देखील एक मंच मिळतो. माझं तर आव्हान आहे की, मातोश्री दूर राहिलं, अमरावतीच्या एखाद्या शाखा प्रमुखाच्या घरासमोर जाऊन आरती करावी, हनुमान चालिसा म्हणावी. ती तारीख आणि वेळ माझ्या शिवसेनेच्या शाखा प्रमुखाला द्यावी. तर त्यांचं फार मोठं कर्तृत्व आहे,असा टोला उदय सामंत यांनी लगावला आहे.