कष्टकऱ्यांच्या मुलांनी घेतला मनसोक्त आंबा खाण्याचा आनंद

बालगोपाळांसाठी आंबे खाणे स्पर्धा : प्रल्हाद गवळी मित्रपरिवार तर्फे आयोजन

पुणे : पिवळाधम्मक रसाळ आंब्यांनी भरलेले हात आणि तोंड… हसत एकमेकांना चिडवत आंबे खाण्यासाठी सुरु असलेली चढाओढ.. अशा आंबेमय झालेल्या वातावरणात वंचित, विशेष बालगोपाळांसह कष्टकऱ्यांच्या मुलांनी आंब्यावर मनसोक्त ताव मारला. हरियाणातील सुप्रसिद्ध महाबली हनुमान व दोन वानर वेशभूषेमध्ये कलाकारांनी यावेळी मुलांचा उत्साह वाढवला.

यामध्ये शहराच्या पूर्व भागातील कष्टकरांच्या मुला मुलींसह, विविध सामाजिक संस्थांमधील १५०० हून अधिक चिमुकले सहभागी झाले होते. प्रल्हाद गवळी मित्र परिवार तर्फे रविवार पेठेतील संत नामदेव चौक येथे ही स्पर्धा झाली. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी स्पर्धेला भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी आमदार दीपक पायगुडे, मनसे सरचिटणीस अजय शिंदे, वसंत मोरे, अभिनेता रमेश परदेशी, माजी नगरसेविका सुशीला नेटके, आशिष देवधर, गणेश भोकरे, आयोजक प्रल्हाद गवळी, साई चकोर, बाळासाहेब देवळे, भाई कात्रे, सिध्दार्थ कुंजीर, विकास गवळी, श्रीकांत मंडले, गौरव गवळी, निलेश डाखवे, नरेश देवकर आदी उपस्थित होते.

प्रल्हाद गवळी म्हणाले, वंचित विशेष आणि कष्टकऱ्यांच्या मुलांना आंबे खाण्याचा आनंद मिळावा, यासाठी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उन्हाळ्याच्या दिवसात सामान्य मुलांना आंबे खाण्याचा आनंद मिळतो. हा आंब्यांचा गोडवा कष्टकऱ्यांच्या आणि वंचित मुलांना देखील मिळावा, यासाठी हा उपक्रम घेण्यात आला.

या स्पर्धेत मुळशी पॅटर्न फेम अभिनेता रमेश परदेशी उर्फ पिटया भाई याने स्वतः सहभागी होत एका मिनीटात चार आंबे खाल्ले आणि या मुलांचा उत्साह वाढवला.