क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्सच्या मालकावर कारवाई करा – भुजबळ  

नागपूर :- नाशिक येथे खाजगी ट्रॅव्हल बस अपघातात १२ प्रवाश्यांना आपला जीव गमवावा लागला. तसेच यामध्ये ४१ प्रवासी जखमी झाले. या घटनेची सखोल चौकशी करून ३० प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी असतांना ५२ प्रवाश्यांची वाहतूक करणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच अपघातात मृत व जखमी व्यक्तींना शासनाने जाहीर केलीली मदत तातडीने देण्यात यावी अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आज नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी सुचनेद्वारे केली.

लक्षवेधी सूचना मांडताना छगन भुजबळ म्हणाले की, दि.८ ऑक्टोंबर २०२२ रोजी नाशिक येथे खाजगी ट्रॅव्हल बस व आयशर ट्रक यांच्यात अपघात होवून खाजगी ट्रॅव्हल बस पेटल्यामुळे १२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला तर ४१ प्रवाशी गंभीर जखमी झाले. या अपघाताची चौकशी करून अपघाताची कारणे निश्चित करण्याची आवश्यकता आहे. या अपघातग्रस्तांची भेट घेतल्यानंतर मा.मुख्यमंत्री यांनी मयतांच्या वारसांना ५ लाख तर जखमींना २ लाखाची मदत जाहीर केलेली होती. तसेच पंतप्रधान निधी मधूनही २ लाखाची घोषणा केंद्राकडून करण्यात आलेली होती. मात्र मृतांच्या वारसांना व जखमींना अद्यापपर्यंत शासनाकडून मदत मिळालेली नसल्याची तक्रार आहे.त्यामुळे  शासनाने जाहीर केलेली शासकीय मदत वितरीत झाली नसेल तर ती लवकरात लवकर देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली.

तसेच सदर घटनेची सखोल चौकशी करून अपघात होवू नये म्हणून शासनाने उपाययोजना करण्याची नितांत आवश्यकता. यावर शासनाने तातडीने कार्यवाही करावी. केवळ चालकावर कारवाई न करता क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी ट्रॅव्हलसवर कारवाई करा अशी मागणी छगन भुजबळ मागणी छगन भुजबळ यांनी  सभागृहात केली.

त्याचबरोबर नाशिक मुंबई रस्त्यावर ठाणे ते पडघा दरम्यान कंटेनरमुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत असल्याने मुंबई-नाशिक प्रवासात ५ तासाहून अधिक वेळ लागत आहे. यासाठी येथे पोलिसांकडून ट्रॅफिकचे नियोजन करण्यात यावे. तसेच नाशिक पुणे महामार्गावरील देखील वाहतुकीची कोंडी सोडवावी याबाबत सभागृहाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधले.

यावेळी उत्तरात मंत्री शंभूराजे देसाई म्हणाले की, या अपघात प्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत अधिक चौकशी करून दोषी आढळल्यास खाजगी ट्रॅव्हल्सच्या मालकावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात येईल. मृत व जखमी व्यक्तींना शासनाने जाहीर केलेली मदत देण्यात आलेली आहे. मात्र अद्याप मिळालेली नसल्यास तातडीने वितरीत करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. तसेच नाशिक मुंबई व नाशिक पुणे महामार्गावर वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी आणि वाहतुकीमध्ये शिस्तबध्द पणा आणण्यासाठी पोलिसांची संख्या वाढवून पोलीस पेट्रोलिंग आणि योग्य ती उपाययोजना केली जाईल येईल अशी माहिती त्यांनी उत्तर देताना दिली.