Dr. Sanjay Upadhyay | शिक्षणाच्या शेतीत १०वी-१२वी चा उतारा अत्यंत महत्वाचा

Dr. Sanjay Upadhyay | आज जग उलटया पद्धतीने चालताना दिसत आहे. त्यातून विद्यार्थ्यांना यशस्वीपणे प्रवास करायचा आहे. कोणत्याही व्यक्तीच्या प्रगतीचा आलेख आधीच्या घटनांवर अवलंबून असू शकत नाही. तर, ती व्यक्ती पुढे काय करते हे पाहणे गरजेचे आहे. दैनंदिन व्यवहारात एखाद्या शेतजमिनीचा ७-१२ जसा महत्वाचा असतो. त्याप्रमाणे विद्यार्थी दशेमध्ये शिक्षणाच्या शेतीत १०वी-१२वी चा उतारा अत्यंत महत्वाचा आहे, असे मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. संजय उपाध्ये (Dr. Sanjay Upadhyay) यांनी व्यक्त केले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा व शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन स.प.महाविद्यालयातील लेडी रमाबाई हॉल येथे करण्यात आले.

यावेळी ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. सुधाकर आव्हाड, ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सहचिटणीस अमोल केदारी, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. अ.ल.देशमुख, मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, मंगेश सूर्यवंशी, विजय भालेराव, चंद्रकांत निनाळे, राजाभाऊ पायमोडे, राजाभाऊ घोडके, ज्ञानेश्वर रासने, राजाभाऊ चव्हाण, विनायक रासने, रोहित लोंढे, सचिन आखाडे आदी उपस्थित होते.

ट्रस्टच्या योजनेतील नू.म.वि. प्रशालेत शिकणा-या आर्यन काशिद या विद्यार्थ्याने दहावीच्या परीक्षेत ९६.४० टक्के गुण मिळवून योजनेंतर्गत प्रथम क्रमांक पटकाविला. बारावीच्या परीक्षेत नू.म.वि. कनिष्ठ महाविद्यालयातील वाणिज्य शाखेच्या प्रज्ञा चेन्नूर हिने ७२.६७ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला. यांसह कोंढवा येथील बालसंगोपन केंद्रातील विद्यार्थी आशुतोष गाडेकर यांसह उत्तम यश मिळविलेल्या विद्यार्थ्याचे कौतुक यावेळी करण्यात आले.

डॉ.संजय उपाध्ये म्हणाले, मातृभाषा मराठी असलेल्या विद्यार्थ्यांना एकत्र आणून त्यांना मदतीचा हात देण्याचा ट्रस्टचा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे. मातृभाषा उत्तम करण्यासाठी वाचन करणे गरजेचे आहे. आपल्या संस्कृतीमध्ये आई-वडिलांचा आदर करण्याची शिकवण देण्यात आली आहे. मात्र, आज काहीसे वेगळे चित्र पहायला मिळते. हे चित्र बदलण्याकरिता ट्रस्टने सुरु केलेल्या संस्कार वर्गांसारख्या उपक्रमांची मोठया प्रमाणात गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

अ‍ॅड. सुधाकर आव्हाड म्हणाले, शिक्षण हा व्यवसाय आहे, असे समजून त्यातून पैसे उभे राहतील असे पाहिले जाते. मात्र, ट्रस्टकडे दानरुपी आलेल्या निधीतून शिक्षणासाठी पैसे वापरले जात असल्याचे कार्य अत्यंत अभिमानास्पद आहे. शिक्षण हे वाघिणीचे दूध असून यामुळे आपले संपूर्ण आयुष्य सकारात्मकपणे बदलते.

ते पुढे म्हणाले, शिक्षण हे माणसाचे जीवन व विचार बदलणारे असावे. माहिती व ज्ञान यामध्ये खूप फरक आहे. त्यामुळे ज्ञानार्जनासारखे पुण्य आपण सगळ्यांनी मिळविण्याकरिता प्रयत्न करायला हवे, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमात योजनेतील विद्यार्थी व पालकांनी देखील मनोगत व्यक्त केले. महेश सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. स्वाती पंडित यांनी सूत्रसंचालन केले.

योजनेतील मदतीमुळे दोन्ही मुले देशसेवेत
नाना पेठेत अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आम्ही राहात होतो. माझी दोन्ही मुले ट्रस्टच्या योजनेचा भाग झाली आणि आज ती देशसेवेत आहेत. एक मुलगा पोलीस दलात आणि एक मुलगा सीआरपीएफ मध्ये कार्यरत आहे, असे योजनेतील पालक राणी कांबळे यांनी सांगितले. तर, ट्रस्टच्या योजनेत मी शाळेत मिळालेल्या १ टक्क्याच्या फरकाने आलो. त्यामुळे माझ्या जीवनात अमुलाग्र बदल झाला. आज मी चांगल्या कंपनीत नोकरी करीत असल्याचे सूरज चव्हाण याने सांगितले. यांसह कल्याणी शिवले, भाग्यश्री कुंभार या विद्यार्थ्यांनी देखील मनोगत व्यक्त केले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप