मराठा समाजाला आरक्षण मिळवुन देणे हीच खरी दिवंगत विनायक मेटे यांना श्रध्दांजली ठरेल – आठवले  

मुंबई  – मराठा समाजाला आरक्षण मिळवुन देणे हीच खरी दिवंगत नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांना श्रध्दांजली ठरेल. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शिवसंग्रामप्रमुख नेते दिवंगत विनायक मेटे हे शेवटच्या श्वासापर्यंत लढले होते. मराठा समाजातील गरीबांना आरक्षण मिळवुन देण्यासाठी माझा रिपब्लिकन पक्ष सदैव मराठा आरक्षणाच्या लढयात आपल्या सोबत असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी केले.

यावेळी दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी डाँ. ज्योती मेटे, रिपब्लिकन पक्षाचे युवक आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पप्पु कागदे आदि मान्यवर उपस्थित होते.  बीड येथे दिवंगत विनायक मेटे यांच्या जयंती निमीत्त आयोजित जाहीर अभिवादन सभेत ते बोलत होते. सभेपुर्वी दिवंगत विनायक मेटे यांच्या स्मृतीस्थळी जावुन पुष्पांजली अर्पण केली.

मराठा आरक्षण आहे गाठीशी मग मी का राहणार नाही तुमच्या पाठीशी असे सांगत ना. रामदास आठवले यांनी मराठा आरक्षणाच्या लढयाला आपला पाठिंबा असल्याचे सांगितले आहे. दिवंगत विनायक मेटे यांच्याशी आपले जवळचे संबंध होते. दिवंगत विनायक मेटे यांनी विधानभवनात वेळोवेळी मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. राज्यभर त्यांनी मराठा समाजासाठी मोठे काम केले आहे. रिपब्लिकन पक्षानेही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढयात सदैव मराठा समाजाला साथ दिली. मराठा समाजातील गरीबांना आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या नेवृत्वात दलित बहुजन समाजानेही मराठा आरक्षणाच्या आंदोलनात साथ दिली, असे रामदास आठवले यावेळी म्हणाले.