Kamran Akmal | हरभजनने खडसावल्यानंतर पाकिस्तानी क्रिकेटरने वादग्रस्त वक्तव्यासाठी मागितली माफी, म्हणाला…

Kamran Akmal | अलीकडेच पाकिस्तानी क्रिकेटर कामरान अकमलने अर्शदीप सिंगबद्दल वांशिक टिप्पणी केली होती. यानंतर अनुभवी ऑफस्पिनर हरभजन सिंगने संतप्त प्रतिक्रिया देताना कामरान अकमलला चांगलेच खडसावले होते. आता कामरान अकमलने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून हरभजन सिंग आणि संपूर्ण शीख समुदायाची माफी मागितली आहे. ९ जून रोजी झालेल्या भारत-पाकिस्तान टी-२० विश्वचषक सामन्यादरम्यान कामरानने अर्शदीप आणि त्याच्या धर्माबद्दल असभ्य टिप्पणी केली होती.

अकमल काय म्हणाला?
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या शेवटच्या षटकात पाकिस्तानला विजयासाठी १८ धावांची गरज होती. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने हे षटक अर्शदीप सिंगला दिले. अर्शदीप गोलंदाजीसाठी आला तेव्हा अकमल म्हणाला, “काहीही होऊ शकते. १२ वाजले आहेत. १२ वाजता कोणत्याही शीखला षटक द्यायला नको होती.”

हरभजनला राग आला
अकमलच्या (Kamran Akmal) या कमेंटवर भारताचा माजी ऑफस्पिनर हरभजन सिंगही संतापला. त्याने अकमलला आरसा दाखवला. सोशल मीडियावर पोस्ट करत हरभजन सिंगने लिहिले, “लख दी लानत तेरे कामरान अकमल. तुझे घाणेरडे तोंड उघडण्यापूर्वी शिखांचा इतिहास जाणून घ्यावा. आम्ही शीखांनी तुमच्या माता-भगिनींना वाचवले जेव्हा आक्रमणकर्त्यांनी त्यांचे अपहरण केले, वेळ नेहमीच 12 वाजलेली होती. लाज वाटायला हवी.. थोडी कृतज्ञता बाळग.”

कामरान अकमलने मागितली माफी
यानंतर आता कामरान अकमलने त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये त्याने माफी मागितली आणि लिहिले, “माझ्या अलीकडील टिप्पण्यांबद्दल मला मनापासून खेद वाटतो आणि हरभजन सिंग आणि शीख समुदायाची मनापासून माफी मागतो. माझे शब्द अयोग्य आणि अपमानास्पद होते. मला जगभरातील शीख लोकांबद्दल खूप आदर आहे आणि माझा कधीही कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. मला खरच माफ करा.”

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप