रोहित शर्माने सामन्यानंतर दुखापतीबद्दल दिले ‘हे’ महत्वाचे अपडेट 

नवी दिल्ली – भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील (IND vs WI) पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील तिसऱ्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा (Captain Rohit Sharma) फक्त 5 चेंडू खेळल्यानंतर दुखापतग्रस्त झाला. पाठीच्या स्नायूंमध्ये अचानक ताण आल्याने त्याला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. सामन्यानंतर त्याने आपल्या दुखापतीबाबत माहिती दिली.

रोहित शर्मा म्हणाला, ‘माझे शरीर ठीक आहे. आमच्या पुढच्या सामन्यात अजून काही दिवसांचा अवकाश आहे. तोपर्यंत ते पूर्णपणे ठीक होईल अशी आशा आहे. मंगळवारी झालेल्या सामन्यात रोहित जबरदस्त लयीत दिसला. तो 5 चेंडूत 11 धावा करत खेळत होता. त्याच्या या छोट्या खेळीत त्याने एक चौकार आणि एक षटकारही लगावला होता.

विंडीज संघाविरुद्धच्या या सामन्यात भारतीय संघ विजयी झाला होता. या सामन्यात भारतीय संघाला 165 धावांचे लक्ष्य मिळाले होते. सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) येथे 44 चेंडूत 76 धावांची खेळी केली. या खेळीमुळे भारतीय संघाने 7 विकेट्सने सहज विजय मिळवला. सामन्यानंतर रोहित शर्मा म्हणाला, ‘आम्ही लक्ष्याचा पाठलाग अगदी स्पष्टपणे केला. बाहेरून पाहत असताना आमच्या फलंदाजांनी जास्त धोका न पत्करता हा सामना जिंकला असे वाटले असते. सूर्यकुमारने श्रेयससोबत चांगली भागीदारी रचली. जेव्हा तुम्ही अशा ध्येयाचा पाठलाग करता तेव्हा काहीही होऊ शकते. खेळपट्टीवरून गोलंदाजांना चांगली मदत मिळाली, त्यामुळे येथे हे लक्ष्य सोपे नव्हते.

5 सामन्यांच्या T20 मालिकेत भारतीय संघ 2-1 ने आघाडीवर आहे. या मालिकेतील पहिला सामना टीम इंडियाने एकतर्फी जिंकला. यानंतर दुसऱ्या सामन्यात त्यांना रोमहर्षक पराभवाला सामोरे जावे लागले. आता तिसरा सामना जिंकून टीम इंडियाही मालिका जिंकण्याच्या जवळ पोहोचली आहे.