दसरा मेळावा :  शिंदे सरकारने नसता आगाऊपणा केला होता, हायकोर्टाने सणसणीत चपराक दिली – वागळे

मुंबई  : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) यांच्या गटातील सेनेला आज मुंबई हायकोर्टात (Bombay High Court) सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई हायकोर्टात आज मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानात दसरा मेळाव्यासाठी नेमकी कुणाला परवानगी मिळावी या मुद्द्या संबंधित याचिकांवर सुनावणी झाली. या सुनावणीत मुंबई महापालिकेचे वकील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) गटाचे आमदार सदा सरवणकर (MLA Sada Saravankar) यांचे वकील आणि ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई (Anil Desai) यांच्या वकिलांनी आपापल्या पक्षकारांची भूमिका मांडली. तीनही पक्षकारांचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने शिंदे गटाची मध्यस्थी याचिका फेटाळली.

कोर्टाने सदा सरवणकर यांची याचिका फेटाळली आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची हमी घेण्याच्या अटीवरुन उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाने ही लढाई जिंकली. उद्धव ठाकरे यांच्या गटाला परवानगी मिळाल्यानंतर शिंदे गट सुप्रीम कोर्टात जाईल, अशा चर्चांना उधाण आलंय. शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी देखील याबाबतची प्रतिक्रिया दिली. त्यामुळे शिंदे गट सुप्रीम कोर्टात जाणार, अशी चर्चा सुरु झाली आहे.

दरम्यान, यावरून जेष्ठ पत्रकार निखील वागळे यांनी शिंदे गटावर प्रहार केला आहे. ते म्हणाले, दसरा मेळाव्याची झुंज उद्धव ठाकरे यांनी मुंबई हायकोर्टाच्या मदतीने जिंकली आहे. शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी नाकारुन एकनाथ शिंदे सरकारने नसता आगाऊपणा केला होता. त्याला हायकोर्टाने सणसणीत चपराक दिली आहे. भाजपच्या नादी लागल्याचा हा परिणाम दिसतो!असं वागळे यांनी म्हटले आहे.