प्रदीप कुरुलकर हनी ट्रॅप प्रकरण : T20 World Cup मध्ये भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या सामन्यात…

Pune – पुण्यातील संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे संशोधक प्रदीप कुरुलकर (Pradeep Kurulkar)  यांनी देशाच्या संरक्षण विभागाची गोपनीय माहिती पाकिस्तानला दिली असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. पाकिस्तान गुप्तचर विभागाने कुरुलकर कडून गोपनीय माहिती मिळवण्यासाठी जाणीवपूर्वक हा सापळा रचला असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.

कुरुलकर यांनी इमेलच्या माध्यमातून देशाच्या सुरक्षेविषयी संवेदनशील माहिती, छायाचित्र, ध्वनिचित्रफिती, कागदपत्र पाकिस्तानला दिले आहेत, असं न्यायवैद्यक अहवालात म्हटलं आहे. हा ईमेल आयडी पाकिस्तानमधील असल्याचं निष्पन्न झालं आहे. तसंच कुरुलकर शासकीय पासपोर्टवर सहा देशांमध्ये गेले होते आणि तेव्हा ते कोणाला भेटले याचा तपास दहशतवाद विरोधी पथक करत आहे.

दरम्यान, झी २४ तास ने दिलेल्या वृत्तानुसार, आता या प्रकरणाचे धागेदोरे आता T20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) झालेल्या भारत आणि पाकिस्तानमधील (India vs Pakistan) सामन्यापर्यंत पोहोचले आहेत. ऑक्टोबर महिन्यात झारा दासगुप्ता या बनावट नावाने कुरुलकर यांच्याशी संपर्क साधण्यात आला होता. याच महिन्यात झालेल्या टी-20 विश्वचषकाच्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला होता. या सामन्यादरम्यान कुरुलकर यांच्याशी बनावट खातं तयार करत संपर्क साधण्यात आला होता. यावेळी पाकिस्तानी तरुणीने भारताच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त करत कुरुलकंरांचा विश्वास संपादन केला होता अशी माहिती समोर आली आहे.