राजे बाई नाचवणारे नव्हते तर बाई वाचवणारे होते; ‘छोटा पुढारी’ घनश्याम दरोडेचा गौतमीच्या डान्सवर आक्षेप

Gautami Patil : नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) हिची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच आहे. लोक गावजत्रा असो, कोणाचा वाढदिवस असो किंवा अगदी हळदीच्या कार्यक्रमालाही गौतमीला बोलवत आहेत. आपल्या गावात किंवा तालुक्याच्या अथवा जिल्ह्याच्या ठिकाणी गौतमीच्या डान्सचा कार्यक्रम व्हावा, अशी  अनेकांची इच्छा असल्याचे दिसून येत आहे.

एका बाजूला अनेकजण गौतमीचे कौतुक करत असताना दुसऱ्या बाजूला छोटा पुढारी म्हणून प्रसिद्ध असलेल्या घनश्याम दराडेने (Ghanshyam Darade) गौतमी पाटीलच्या नृत्यावर आक्षेप घेत तिला महाराष्ट्राचा बिहार करु नका असे आवाहन केले आहे. गौतमी ताईंना कळकळीची विनंती आहे, की महाराष्ट्राची संस्कृती मोडू नका. लावणीला लावणी सारखं राहू द्या. कलेला कलेप्रमानेच सादर केलं पाहिजे असे छोटा पुढारी घनश्याम दरोडे म्हणाला आहे.

फेमस होण्यासाठी तुम्ही उठताय, सुटताय. चुकीचे कृत्य करु नका. फेमस व्हा पण तुमच्या कलेतून व्हा. महाराष्ट्राचा बिहार करु नका. जो महाराष्ट्राच बिहार करेल त्याच्या चुकीला माफी नसणार आहे. सगळ्या तरुणांना मी हात पाय जोडून सांगतो राजे बाई नाचवणारे नव्हते तर बाई वाचवणारे होते. संस्कृतीला तडा जाता कामा नये. वेगळ्या पद्धतीची लावणी तुम्ही ठेऊ नका. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तरुणांचा जीव जातोय. पोलिसांचे नाहक हाल होत आहेत. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने लावणी करु नका,  असे आवाहन घनश्याम दरोडेने केले आहे.