माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, पतीचं पुण्यात निधन

पुणे- राजकीय क्षेत्रातून अत्यंत दु:खद वार्ता पुढे येत आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील (Pratibha Patil) यांचे पती देविसिंह शेखावत (Devisingh Shekhawat) यांचं आज निधन झालं आहे. ते ८९ वर्षांचे होते. पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे पत्नी प्रतिभा पाटील आणि एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. देविसिंह शेखावत यांच्या निधनावर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहेत.

माजी आमदार देविसिंह शेखावत यांचं आज सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी दु:खद निधन (Devisingh Shekhawar Passed Away) झालं. देविसिंह शेखावत यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे त्यांना दोन दिवसांपूर्वीच येथील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र वयोमानामुळे त्यांची प्रकृती खालावत चालली होती. ते उपचाराला प्रतिसाद देत नव्हते. अखेर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. आज संध्याकाळी ६ वाजता पुण्यातच त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.