काश्मिरी पंडितांची खिल्ली उडवल्याचा आरोप; केजरीवालांच्या घराबाहेर राडा

नवी दिल्ली- काश्मिरी पंडितांच्या खिल्ली उडवल्याचा आरोप असणारे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरासमोर (Arvind Kejriwal House) आज जोरदार राडा पाहायला मिळाला. काश्मिरी पंडितांच्या (Kashmiri pandit) मुद्द्यावरून दिल्लीत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर निदर्शने करण्यासाठी आलेले भाजप नेते खासदार तेजस्वी सूर्या यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तेजस्वी सूर्या (mp tejaswi surya) आणि तेजिंदर पाल सिंग बग्गा आणि भाजप कार्यकर्ते आंदोलन करण्यासाठी तेथे पोहोचले होते. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी गोंधळ  घातल्याचा आरोप आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निदर्शनादरम्यान काही तोडफोड देखील झाल्याचे वृत्त असून केजरीवाल यांच्या घराच्या गेटलाही लाल रंग देण्यात आला आहे. याबाबत भाजप खासदार म्हणाले की, त्यांना केजरीवाल यांना काश्मिरी पंडितांसोबत कसा नरसंहार झाला याची आठवण करून द्यायची होती. त्यामुळे ते आज रस्त्यावर उतरले आहेत.

टाइम्स नाऊशी बोलताना भाजप नेते सूर्या म्हणाले- “अरविंद केजरीवाल यांनी या देशातील हिंदूंची माफी मागावी. जोपर्यंत माफी मागितली जात नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील. दरम्यान, आम आदमी पार्टीच्या अधिकृत ट्विटर हँडलवर भाजपने केजरीवाल यांच्या निवासस्थानाची तोडफोड केल्याचा आरोप केला आहे. ट्विटमध्ये लिहिले होते-  मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या घरावर भाजपचा हल्ला! सुरक्षा कठडे तोडले, सीसीटीव्ही कॅमेरे तोडले, भाजपला दिल्ली पोलिसांचा पूर्ण पाठिंबा होता.