Priyanka Gandhi | भाजपाच्या राजवटीत आदिवासींवर अन्याय, महाराष्ट्रात २ लाख आदिवासींना पट्टे दिले नाही

Priyanka Gandhi |  आदिवासी समाजाच्या विकासासाठी काँग्रेस पक्षाने सातत्याने काम केले आहे. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आदिवासी समाजाला जल, जंगल, जमिनचा अधिकार दिला. काँग्रेस सरकारने पेसा कायदा आणला तर राजीव गांधी यांनी पंचायत राज कायदा आणून अधिकार दिले. परंतु भाजपाची विचारधारा याच्या उलट आहे. भाजपा आदिवासी संस्कृती बदलण्याचा प्रयत्न करत आहे. आदिवासींच्या जमिनी उद्योगपतींना दिल्या जात आहेत. महाराष्ट्रात २ लाख आदिवासींना पट्टे दिले नाहीत, तर देशभरातील २२ लाख आदिवासींना पट्टे दिले नाहीत, हा आदिवासींचा सन्मान आहे का, असा सवाल काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी विचारला आहे.

इंडिया आघाडीचे नंदूरबार मतदारसंघातील उमेदवार ॲड. गोवाल पाडवींच्या प्रचारसभेत प्रियंका गांधी बोलत होत्या, त्या म्हणाल्या की, नंदूरबारच्या कालच्या सभेत पंतप्रधानांनी मी शबरीचा पुजारी आहे असा उल्लेख केला पण कुठे श्रीराम ज्यांनी शबरीचा सन्मान केला तर शेकडो शबरींचा अपमान होत असताना गप्प बसणारे नरेंद्र मोदी कुठे ?…हाथरस, उन्नावमध्ये महिलेवर अत्याचार झाला तेव्हाही मोदी गप्प बसले. मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार झाले, महिला खेळाडू न्याय मागत होत्या त्यावेळी मोदी कुठे होते? कुठे भगवान श्री राम व शबरीमाता आणि कुठे नरेंद्र मोदी. उन्नावच्या आपल्या बहिणीवर तसेच या देशातील अनेक महिलांवर महिलांवर अत्याचार होत असताना मोदींनी त्यांना मदत केली नाही, त्याकडे बघितलेही नाही. ज्यांनी महिलांवर अत्याचार केला त्यांच्या मुलांना भाजपाने उमेदवारी दिली.

नरेंद्र मोदी यांनी १० वर्षात जनतेसाठी काय केले ते सांगावे, शेतकरी संकटात आहे, शेती करणे अवघड झाले आहे. आदिवासी, गरिब जनता त्रस्त आहे त्याबद्दल काही बोलावे. मोदींनी परदेशातून काळा पैसा आणून प्रत्येकाला १५ लाख देतो म्हणाले, दरवर्षी २ कोटी रोजगार देतो म्हणाले पण त्यांनी हे काम केले नाही. मोदींचे राजकारण फक्त सत्तेसाठी आहे, जनतेच्या सेवेसाठी नाही असा ह्ल्लाबोल करत लोकसभेच्या निवडणुकीत विचार करून मतदान करा असे आवाहन प्रियंका गांधी यांनी केले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप