‘आई मी परत येईनच.. तोपर्यंत उद्धव आणि शिवसैनिक हीच तुझी मुलं’, राऊतांचं भावनिक पत्र

मुंबई:- गोरेगाव येथील पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले शिवसेना नेता आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) चर्चेत आले आहेत. जामीन अर्जावरील सुनावणी वेळेअभावी त्यांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे. मात्र तुरुंगात असूनही संजय राऊत (Sanjay Raut Letter) यांची लेखणी थांबलेली नाही. संजय राऊत यांनी ८ ऑगस्टला सत्र न्यायालयात बसून आपल्या मातोश्रींसाठी एक पत्र लिहिले होते. हेच पत्र आता बुधवारी (१२ ऑक्टोबर) त्यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवर ट्वीट केले आहे.

या पत्रांत त्यांनी आपल्या मातोश्रींना (Sanjay Raut Mother) चिंता करू नका, असे सांगितले आहे. आपल्या अनुपस्थितीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) आणि असंख्य शिवसैनिक हीच तुझे मुले असतील, असे भावनिक शब्द रेखाटले आहेत.

आपल्या पत्रात ते आईंना म्हणतात की, “जशी तू माझी आई आहेस; तशी शिवसेनादेखील आपल्या सगळ्यांची आई आहे. आईशी बेइमानी करण्यासाठी माझ्यावर दबाव होता. सरकारविरुद्ध बोलू नका, महाग पडेल, अशा धमक्या होत्या. या धमक्यांना मी भीक घातली नाही. या एकाच कारणासाठी मी आज तुझ्यापासून दूर आहे. तरीही चिंता नसावी, मी येईनच.. तोपर्यंत उद्धव आणि असंख्य शिवसैनिक तुझे मुले असतील, काळजी घे…!”

याखेरीज संजय राऊत यांनी पत्रात लिहिले आहे की, आज राज्य षड्यंत्रकर्त्यांच्या हाती गेले आहे. त्यांना शिवसेनेचे अस्तित्व आणि महाराष्ट्राची शान चिरडायची आहे. तसेच त्यांनी आपल्या पत्रात त्यांना झालेली अटक आणि त्यावेळीच्या प्रसंगाची कहाणी कथन केली आहे. या कठीण काळातही त्यांची आई पाठिशी ठामपणे उभी होती. तसेच तिच्याकडूनच संघर्षाची शिकवण मिळाल्याचे संजय राऊतांनी पत्रात नमूद केले आहे.