या छळातूनच नव्या क्रांतीच्या ठिणग्या उडतील; सेनेच्या ढाण्या वाघाचे आईला कोठडीतून पत्र

मुंबई:- गोरेगाव येथील पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले शिवसेना नेता आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) चर्चेत आले आहेत. जामीन अर्जावरील सुनावणी वेळेअभावी त्यांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे. मात्र तुरुंगात असूनही उद्धव ठाकरे यांच्या गटातील नेते संजय राऊत (Sanjay Raut Letter) यांची लेखणी थांबलेली नाही. संजय राऊत यांनी ८ ऑगस्टला सत्र न्यायालयात बसून आपल्या मातोश्रींसाठी एक पत्र लिहिले होते. हेच पत्र आता बुधवारी (१२ ऑक्टोबर) त्यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवर ट्वीट केले आहे.

शिवसेनेचा ढाण्या वाघ संजय राऊत यांनी आईसाठी लिहिलेल्या पत्रात, विरोधकांकडून अप्रत्यक्षपणे आपल्याला व सहकारी नेत्यांना होत असलेल्या त्रासाला घाबरत नाही, असे म्हटले आहे. यादरम्यान त्यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi), राहुल गांधी (Rahul Gandhi) व कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना दिल्या जात असलेल्या त्रासाचाही उल्लेख केला आहे. मात्र या छळातूनच नव्या क्रांतीच्या ठिणग्या उडतील, अशा शब्दांत डरकाळी फोडली आहे.

“आज कारस्थानी लोकांच्या हाती राजशकट सापडले आहे. त्यांना शिवसेनेचे अस्तित्व व महाराष्ट्राचा स्वाभिमान पायदळी तुडवायचा आहे. पडद्यामागे बरेच काही चालले आहे. अशा वेळी मान खाली घालून, हात बांधून एखाद्या गुलामासारखे कसे जगता येईल? मी आताच ऐकले, नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया व राहुल गांधींचाही छळ सुरू आहे. रोहित पवार यांनाही त्रास दिला जातोय. या छळातूनच नव्या क्रांतीच्या ठिणग्या उडतील व नव्या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा होईल. लोकशाहीचा पुन्हा जन्म होईल”, असे कोठडीतून आईला लिहिलेल्या पत्रात संजय राऊत यांनी लिहिले आहे.