नवनीत राणांचे वडील फरार म्हणून घोषित; हजार रुपयांचा दंडही न्यायालयाने ठोठावला

Navneet Rana Father : बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणी अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा या सध्या न्यायालयीन लढाई लढत आहेत. मात्र आता या लढाईत नवनीत राणा न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. मुंबईतील शिवडी न्यायालयाने नवनीत राणांचे वडील हरभजनसिंह रामसिंह कुंडलेस यांना फरार घोषित केलं आहे. तसेच, न्यायालयाने नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांना एक हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

नवनीत राणांनी उमेदवारी अर्जाबरोबर दिलेली जात प्रमाणपत्र हे बोगस असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी मुंबईत शिवडी न्यायालयात सुनावणी पार पडली. तेव्हा, नवनीत राणांच्या वडिलांच्या पुकारा करण्यात आला. पण, त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावल्यानंतरही त्यांना अटक झाली नाही. तसेच, ते न्यायालयात हजरही झाले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने त्यांना फरार घोषित केलं. लोकसत्ताने याबाबत वृत्त दिले आहे.