ओरल हेल्थ फाउंडेशनच्या माध्यमातून ३०० रुग्णांची मोफत दंततपासणी ; भानुशाली परिवाराचा स्तुत्य उपक्रम

पालघर – आपल्या सभोवतालच्या परिसरातल्या लोकांना दातांच्या आरोग्याविषयी अजिबात माहिती नाही.दातांची व्यवस्थित काळजी घेतली नाही तर त्यातून उद्भववणाऱ्या अनेक गंभीर आजारांची लोकांना जाणीव व्हावी,गरज पडलीच तर अगदी महागतली – महाग शस्त्रक्रिया सुद्धा अगदी रास्त दरात करून रुग्णाला बरं करावं ! या उद्देशाने पालघर (Palghar) जिल्ह्यातील वाडास्थीत डॉ. सूरज भानुशाली (Dr. Suraj Bhanushali) यांनी ओरल हेल्थ फाउंडेशन (Oral Health Foundation) नावाने एक संस्था सुरू केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून ते पालघर जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागात दंत चिकित्सा कॅम्प आयोजित करून लोकांवर मोफत उपचार करत असतात.

नुकताच त्यांनी वाडा तालुक्यातील परली या गावात दंत चिकित्सा कॅम्प आयोजित केला होता यात साधारण ३०० रुग्णांची मोफत तपासणी करत आवश्यक त्या रुग्णांना औषधोपचार देखील केला.

याविषयी हॅलो महाराष्ट्र सोबत बोलताना भानुशाली म्हणाले की आई – वडिलांच्या आशीर्वादाने म्हणा किंवा पुण्याईने म्हणा आयुष्यात कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही.त्यामुळे दंत चिकित्सक म्हणून काम करताना प्रत्येक गोष्टीकडे कमर्शिअल दृष्टीने बघण्याची कधीचं गरज पडली नाही. म्हणून स्वयंप्रेरणेने,कुणाकडूनही कुठलीच आर्थिक मदत न घेता हे काम करायचं मी ठरवलं आहे.

डॉ.भानुशाली यांच्या सोबत त्यांच्या सुविध्य पत्नी डॉ. ऋतुजा या सुद्धा दंत चिकित्सक आहेत. या कामात त्यांची देखील मोलाची साथ लाभल्याचं डॉ.सूरज सांगतात.