गायिका सावनी आणि शार्वीचा यंदाचा मातृदिन आहे खास, प्रदर्शित केलं सुरेल गाणं!

पुणे – राष्ट्रीय पुरस्कार विजेती, सुमधुर गळ्याची गायिका सावनी रविंद्र आणि तीची मुलगी शार्वी यांच्यासाठी यंदाचा मातृदिन फारचं खास आहे. कारण सावनी पहिलाच मातृदिन तीच्या मुलीसोबत साजरा करणार आहे. तिने नुकतंच सावनी ओरिजनल या तीच्या युट्यूब सिरीजमधून आई आणि मुलीचं गोडं नातं मांडणारं, ‘मॉं कोई तुझसा नहीं’ हे हिंदी गाणं‌ नुकतंच प्रदर्शित केलं आहे. या आधी तिने शार्वीसाठी ‘लडिवाळा’ ही अंगाई गायली होती. सावनीच्या चाहत्यांनी या गाण्याला भरघोस प्रतिसाद दिला आहे.

गायिका सावनी रविंद्र गाण्याविषयी सांगते, “सर्वप्रथम सर्वांना मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा ! सावनी ओरिजनल या युट्यूब सिरीजमधून मी याआधी विविध भाषेतील गाणी गायली आहेत. यावर्षीचा मातृदिन माझ्यासाठी खूप खास आहे. कारण मी आई झाल्यानंतरचा हा पहिलाच मातृदिन आहे. माझ्यासाठी एक वेगळीच अनुभूती आहे. आई होणं हे अजिबात सोप्पं नाही. आता स्वतः आई झाल्यावर कळतंय आपली आई किती श्रेष्ठ आहे. आईने आपल्यासाठी किती गोष्टी केल्या आहेत. आपण एरवी  गृहीत धरतो. परंतु प्रत्येक मुलीला स्वतः आई झाल्यावर कळतं आई होणं म्हणजे काय! अर्थातच मलाही आता कळलंय. माझ्याकडून मी सर्व मातांना ‘मॉं कोई तुझसा नहीं’ हे गाणं समर्पित करते!

पुढे ती सांगते, “मी आणि शार्वी या गाण्यात पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहोत. अत्यंत स्वीट आणि क्यूट हा म्यूझिक व्हिडिओ आहे. बरीच लोकं मला सोशल मीडियावर विचारत असतात. की आम्हाला शार्वीला बघायचंय. या गाण्यात आमच्या दोघांची दिनचर्या तुम्हाला पाहायला मिळेल. एक वर्कींग मदर या नात्याने माझा दिवस शार्वीला सांभाळतं कसा जातो. हे तुम्हाला या गाण्यात पाहायला मिळेल. या गाण्याचं संगीत तेजस चव्हाण याने केलं आहे, तर या गाण्याचे गीतकार पुलकीत मुसाफिर आहे. आपली आपल्या आईप्रतीची कृतज्ञता केवळ मातृदिनाच्या दिवशी न व्यक्त करता रोज व्यक्त करायला हवी. आई होणं ही जगातील सर्वात सुंदर गोष्ट आहे. लडिवाळा या अंगाईत शार्वी फारच लहान होती. त्या गाण्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला. तर आता शार्वी मोठी झाली आहे. या गाण्यात शार्वी काय काय धम्माल करते हे जरूर पाहा. तुम्हा रसिक प्रेक्षकांचं प्रेम असंच कायम असू दे. हीच सदिच्छा!!”