तुम्ही महाराष्ट्राच्या मातीत जन्माला तरी कसे आलात? ठाकरेंनी शहाजी बापूंना धुतलं 

Mumbai – दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची (Uddhav Thackeray) मुलाखत घेतली. शिवसेना आमदारांचा एक गट फुटल्याने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील असलेले सरकार कोसळले आणि त्यानंतर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. या मुलाखतीत शिवसेनेतील बंडखोरी आणि राज्यातील बदलते राजकारण यावर प्रखरपणे उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले.

दरम्यान, या मुलाखतीमध्ये बोलताना झाडी-डोंगर फेम शहाजी पाटील यांच्यावर सुद्धा हल्लाबोल केला.उद्धव ठाकरे म्हणाले, झाडी, डोंगार, हाटील महाराष्ट्रात नाही का? किती सुंदर आहे महाराष्ट्र. ग्रामीण भागातल्या आमदारांना महाराष्ट्राच्या या निसर्गाची भुरळ पडत नाही आणि गुवाहाटीच्या निसर्गाची भुरळ पडते. मला एक कळलंच नाही की मग तुम्ही महाराष्ट्राच्या मातीत जन्माला तरी कसे आलात? ज्या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलात त्या मातीची तुम्हाला ओढ नाही, प्रेम नाही. त्या मातीचं वैभव दिसलं नाही.

मी स्वत: कलाकार आहे. त्यावरुन सुद्धा चेष्टा झाली होती. मी पंढपुरच्या वारी, गडकिल्ल्यांची फोटोग्राफी केली आहे. त्यावेळी महाराष्ट्र पाहिला तर इतका नटलेला, थटलेला दिसतो. आम्ही तर शहरीबाबू आहोत, तुम्ही ग्रामीण भागातील आहात. पण ग्रामीण भागात राहूनही तुम्हाला महाराष्ट्राचं सौंदर्य कधी दिसलं नाही, त्याचं वर्णन करावंसं वाटलं नाही आणि थेट गुवाहाटी दिसलं. मी गुवाहाटी वाईट म्हणत नाही, प्रत्येक प्रदेश चांगला आहे. पण हे मातीसाठी काय करणार?, अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली आहे.