शाई कशापासून बनवली जाते? शाईचा इतिहास काय आहे? सर्व माहिती एकाच क्लिकवर

लिखाणासाठी वेगवेगळे पेन वापरले जातात. शाई पेनपासून ते बॉल पेनपर्यंत पेनाचे वेगवेगळे ब्रँड बाजारात उपलब्ध आहेत. परंतु पेनला पूर्ण बनवते ती शाई (INK). लिखाणासाठी, पुस्तके, वृत्तपत्रे, मॅगझिन, पोस्टर्स, बॅनर्स, इत्यादींच्या छपाईसाठी शाई वापरली जाते. अधिकतर शाई ही निळ्या किंवा काळ्या रंगाची असते. परंतु नेहमी आपल्या वापरात येणारी ही शाई नेमकी कशापासून बनवली जाते? तिचा काही इतिहास आहे का? शाईचे काही प्रकार आहेत? असे प्रश्न कधी तुम्हाला पडले आहेत का? या खास लेखात आम्ही तुम्हाला शाईशी संबंधित सर्व माहिती देणार आहोत. (What Is Ink Made Of)

सर्वात प्रथम शाई म्हणजे काय? हे थोडक्यात समजून घेऊ. शाई म्हणजे पाण्यापेक्षा घट्ट असलेला रंग देणारा द्रवपदार्थ होय. हा द्रवपदार्थ वापरून लिखाण केले जाऊ शकते किंवा प्रतिमा काढल्या जाऊ शकतात. शाई ही मुख्यत्वे रंगद्रव्ये, रेजिन आणि मेण या घटकांपासून बनवली जाते. याव्यतिरिक्त शाई बनवण्यासाठी सॉल्व्हेंट्स, अल्कोहोल, वंगण, कार्बन, रंगद्रव्ये, रंग, अॅनिलिन, डेक्सट्रिन, ग्लिसरीन, फ्लोरोसेंट आणि इतर साहित्यही (Solvents, alcohol, lubricants, carbon, pigments, dyes, aniline, dextrin, glycerin, fluorescent and other materials) वापरले जातात.

जॉइन करा आझाद मराठीचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

शाईचा इतिहास
शाई हा शब्द प्राचीन ग्रीसमधून आपल्याकडे आला आहे. enkaiein (एन्काईइन) म्हणजे ‘जळणे’, या शब्दापासून ink म्हणजेच शाई या शब्द तयार झाल्याचे म्हटले जाते. प्राचीन चीनमध्ये लिखित स्वरूपात शाईचा उपयोग आढळतो. तसेच भारतात शाईचा उपयोग तसेच निर्यात केल्याचे पुरावे आढळतात. भारत सुमारे १९२० पर्यंत शाई निर्मिती व निर्यात करणारा जगातील प्रमुख देश होता. नंतर जर्मनी या देशाने हे तंत्र शिकुन घेतले आणि निर्यात करायला सुरुवात केली.

शाईचे काही प्रकार
शाईच्या वापरानुसार तिचे काही प्रकार विकसित झाले. छपाईची शाई आणि लिखाणाची शाई असे शाईचे प्रकार विकसित झाले आहेत. त्वचेवर लावण्यासाठी असलेली शाई ‘म्हैसूर शाई’ म्हणून ओळखले जाते. निवडणुकीत ही वापरली जाते. ही शाई कर्नाटकातील म्हैसूर येथे तयार होऊन देशात व विदेशात या शाईचा पुरवठा केला जातो. कर्नाटक सरकारच्या अखत्यारीतील म्हैसूर पेंटस् वॉर्निश लिमिटेड (एमपीव्हीएल) म्हैसूर या कंपनीत शाई तयार होते.

तसेच काजळापासूनही शाई तयार केली जाते, जिला काजळाची शाई असे म्हणतात. दिव्या भोवतीचे काजळ (कार्बन) व एरंडाचे तेल हे वापरून ही शाई तयार होते. तसेच लेझर प्रिंटर शाई – ही भुकटी स्वरूपात असते व इंक जेट शाई – ही द्रव्य स्वरूपात असते.