पंजाबच्या उपमुख्यमंत्र्यांना भाजपा कार्यकर्त्यांचा घेराव; ‘मोदी झिंदाबाद’च्या घोषणा देण्यास भाग पाडले

फिरोजपूर- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटींनंतर आता पंजाबमधील भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. या संतापामुळे या कार्यकर्त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री ओपी सोनी यांचा ताफा फिरोजपूरमध्ये अडवला आणि एवढेच नाही तर जमावाने उपमुख्यमंत्र्यांना ‘मोदी झिंदाबाद’च्या घोषणा देण्यास सांगितले.

या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये लोकांनी उपमुख्यमंत्र्यांना ‘मोदी झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या आणि त्यानंतर त्यांच्या ताफ्याला पुढे जाण्याची परवानगी दिली. यावेळी पोलिस कर्मचारीही तेथे उपस्थित होते आणि त्यांनी गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये उपमुख्यमंत्री ओपी सोनी यांच्या ताफ्याला भाजप कार्यकर्त्यांनी घेरल्याचे दिसत आहे. कार्यकर्त्यांनी मोदी झिंदाबाद आणि जय श्री रामच्या घोषणा दिल्या. यादरम्यान पंजाब पोलीस कर्मचारीही तैनात करण्यात आले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री ओपी सोनी त्यांच्या गाडीतून उतरले आणि मोदी झिंदाबादच्या घोषणा दिल्या, त्यानंतर जमावाने त्यांना जाऊ दिले. येथेही पंजाब पोलिसांना आंदोलकांना हटवण्यात अपयश आले.

बुधवारच्या घटनेनंतर भाजप समर्थक काँग्रेसच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. गुरुवारी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्या ताफ्यालाही आंदोलकांच्या एका गटाने घेराव घातला होता.