शिवसेनेचे राजकारण देशात कुणीच स्विकारेना, केजरीवालांना जमलं ते पवार साहेबांना का जमेना?

बीड –  पाच राज्याच्या विधानसभा निवडणुका नुकत्याच संपन्न झाल्या त्यात चार राज्यात भाजपाने मुसंडी मारली तर पंजाबात आप पार्टीने राज्य आणुन दाखवले. या निवडणुकीचा संदर्भ महाराष्ट्राशी याचसाठी जोडल्या जातो. इथे सत्तेत असलेल्या शिवसेनेने उत्तरप्रदेश, गोवा आणि मणिपुर राज्यात निवडणुका लढवल्या अगदी उमेदवारांचं डिपॉझिटाची इज्जत राहिल त्यापेक्षा 0.0 एवढी मते मिळाली आणि सेनेला त्यांची कुवत दाखवुन दिली. शिवसेनेच्या राजकारणाला बाहेरच्या राज्यात लोक स्विकारायला तयार नाहीत तर दुसर्‍या बाजुने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अवघ्या दहा वर्षाच्या राजकारणात दोन राज्य नेतृत्वाखाली आणले. जे केजरीवालांना जमलं तेच महाराष्ट्रात जाणता राजा म्हणुन ओळखले जाणारे शरदचंद्रजी पवार तथा ठाकरे कुटुंबियांना का जमलं नाही? केजरीवालाची दहा वर्षे आणि पवार-ठाकरेंची साठ वर्षे बरंच काही सांगुन जाते.असं भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

प्रसिद्धीपत्रकात ते म्हणतात,  उत्तरप्रदेश, गोवा, मणिपुर, उत्तराखंड आणि पंजाब या राज्यात मागच्या आठवड्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची देशात पुन्हा एकदा लाट सिद्ध झाली. चार राज्य बहुमताने विशेषत: ज्या उत्तरप्रदेशाकडे देशाचं लक्ष लागलं आणि उद्याच्या लोकसभेचं भविष्य जे राज्य अगोदरच सांगते ते देशात मोठं राज्य पुन्हा एकदा भाजपाच्या ताब्यात आलं. मोदीशिवाय देशाला पर्याय नाही. विरोधकांनी कितीही गरळ ओकली तरीही सामान्य जनता आणि मतदार मात्र मोदी है तो सबकुछ है असं म्हणत त्यांच्या नेतृत्वाला पसंती देत आहेत.अर्थात देश चालवताना सबका साथ, सबका विकास आणि शेवटच्या माणसाचं कल्याण या त्रिसुत्रीचा अवलंब स्वातंत्र्यानंतर देश चालवणार्‍या काँग्रेसनं कधीच केला नाही. ते केवळ मोदी यांच्या रूपाने घडतं म्हणुन लोक खंबीरपणे भाजपला साथ देतात. या निवडणुकीचा संदर्भ महाराष्ट्राच्या राजकारणाशी जोडण्याचं कारण हा सवाल लिखाण वाचल्यानंतर कुणी करू शकतं? म्हणून उठाठेव यासाठी महाराष्ट्रात महाविकास आघाडी सत्तेवर असुन शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळुन एकत्र आहेत.

दोन वर्षात या सत्ताधार्‍यांनी महाराष्ट्राचं अक्षरश: वाटोळे करून सोडलं. एक तर शिवसेनेनं आपली वैचारिक भुमिका बदलली हिंदुत्व गंगेत सोडलं आणि यांच्या मांंडीला मांडी लावुन बसले. महाविकास आघाडीसोबत शिवसेना गेल्यापासुन राज्यात अवसान गळित गात्र अवस्था त्यांची होत चालली पण संजय उवाच यांना सत्तेची नशा एवढी चढली की जणु काही शिवसेनेला राज्याबाहेर लोक सलाम करू लागले याचा अहंकार झाला. बिहारच्या विधानसभा निवडणुकीतच सेनेला त्यांची जागा बाहेरच्या लोकांनी दाखवुन दिली पण या निवडणुकीत गोवा, उत्तरप्रदेश आणि मणिपुरमध्ये त्यांनी उमेदवार उभा केले. का केले? कळत नसलं तरीही मोदीद्वेषाने पछाडलेली शिवसेना मोठ्या मोठ्या गोव्यात आरोळ्या देत होती. पुत्र आदित्याला घेवुन संजय यांनी उत्तरप्रदेशात सभा घेतल्या. गोव्यात तर विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या मतदारसंघात सभा घेतली. आणि त्यांनी उभा केलेल्या उमेदवाराला शतक पुर्ण करेल एवढी मते मिळाली नाहीत. केवळ 97 मते मिळाली. तिन्ही राज्यात शिवसेनेच्या भुमिकेला मुळात लोकांनी नाकारले. याचाच अर्थ एकदा बिहारात आणि आता तीन राज्यात म्हणजे शिवसेनेच्या राजकारणाला बाहेरच्या राज्यात लोक स्विकारायला तयार नाहीत हे त्रिवार सत्य झालं. कदाचित येणार्‍या निवडणुकीत महाराष्ट्रातसुद्धा शिवसेनेची अवस्था अशी झाली तर नवल वाटणार नाही. मुळ विचाराशी तिलांजली देवुन सत्ता पदासाठी केवळ राजकारण करणारी शिवसेना हा चेहरा राज्यात उघडकीस आला. खरं तर शिवसेनेला सोबत घेतल्याचे परिणाम काँग्रेसलासुद्धा इतर ठिकाणी भोगावे लागतात तो भाग वेगळा. कधी तरी काँग्रेसच्या लक्षात येईलच.

केजरीवाल 10 वर्षे, पवारांची 60 वर्षे
या निमित्ताने अजुन एका गोष्टीचा वेध घेणे उचित वाटते. अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाचं आणि राजकारणाचं वय देशात दहा ते बारा वर्षाचे आहे. त्यांनी पहिल्या टप्यात दिल्लीत राज्य आणलं आणि दुसर्‍या पाच वर्षात पंजाब राज्य घेवुन दाखवलं. खरं तर भल्या भल्या पुढार्‍यांचे राजकिय आयुष्य संपत आलं तरी स्वबळावर त्यांना एकदाही सत्ता आलेली नाही असे अनेक देशात आणि राज्यात नेते आहेत. त्यापैकीच राष्ट्रवादी पक्षाचे संस्थापक शरदचंद्रजी पवार हे महाराष्ट्रातील मातब्बर नेते म्हणुन ओळखले जातात. चार वेळा मुख्यमंत्री, अनेक वर्षे केंद्रात संरक्षण मंत्री त्यांच्या राजकारणाचा इतिहास सर्वांना माहित आहे. इथे उगाळण्याची गरज नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या महाराष्ट्राचं वर्षानुवर्षे राजकारण करणारे नेते म्हणुन त्यांच्याकडे पाहिल्या जाते. अनेक विश्लेषण त्यांच्या नावाशी जोडली जातात. पण पवारांना स्वबळाची सत्ता महाराष्ट्रात कधीच आणता आली नाही. बरं स्वबळ बाजुला ठेवा. स्वत:चे 100 आमदारही निवडुन आणता आले नाहीत. हे का जमलं नाही? त्याची कारणंमिमांसा वेगवेगळी असली तरी ठाकरे आणि पवार कुटुंब हे महाराष्ट्राच्या राजकिय वर्तुळात नेहमीच अग्रभागी पण स्वबळावर कुणालाही जमलेलं नाही. राजकिय डावपेच किंवा उलथापालथी तथा तडजोडी करून सत्तेत येणं आणि स्वबळावर एकहुकमी सत्ता येणं यात फार मोठा फरक आहे.

सुरूवातीला उल्लेख केल्याप्रमाणे दहा वर्षात अरविंद केजरीवाल दोन राज्य मिळवतात पण संपुर्ण आयुष्य गेलं तरी महाराष्ट्रात मात्र स्वबळ सत्ता येवु शकली नाही याला काय म्हणावं? स्वत:चं राज्य स्वबळावर जिंकता येईना तर मग या मंडळींनी बाहेरच्या राज्यात घुसावं तरी कशाला? असे अनेक प्रश्न पुढे येतात. कदाचित यापुढे शिवसेना बाहेरच्या राज्यात शिरकाव करेल का नाही? हा भाग वेगळा. कारण लोक स्विकारायला तयारच नाहीत हे कालच्या निवडणुकीत सिद्ध झालं. भविष्यात भाजप सोडला तर एकहाती स्वबळ कुणाच्याही पक्षाला मिळु शकत नाही अशी अवस्था आज सत्ता असुनही महाविकास आघाडीच्या पक्षांची आहे हे त्रिवादी सत्य कुणीच नाकारू शकत नाही. 2024 साली स्वप्न कुणी पहाण्याची गरज नाही. पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच होणार याचं पायाभरणी म्हणजेच या निवडणुका असं म्हणायला हरकत नाही. राजकारणात भपकेबाज करायचा, मोठीमोठी विश्लेषणं, बिरूदं लावायची आणि गल्लीतलं राजकारण करताना दिल्लीश्वराच्या गप्पा मारायच्या हे राजकारणात ज्या नेत्यांना जमतं त्यांची नेतृत्व प्रसारमाध्यमातल्या वर्तुळाभोवती मर्यादित असतात हे सांगायला आता कुणा भविष्यकाराकडे जाण्याची गरज नाही. म्हणुनच सुरूवातीला म्हटल्याप्रमाणे शिवसेनेच्या राजकारणाला देशात कुणी स्विकारेना, केजरीवालांना जमलं ते पवारांना का जमेना?

ममता बॅनर्जी मुंबईत येवुन गेल्या. त्यांंचे पश्चिम बंगालमध्ये स्वबळ आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव वर्षावर येवुन गेले. सिल्वरवर गेले. पण त्या राज्यात त्यांचं स्वबळ आहे हे तरी लक्षात यायला हवं. उगीच टिमक्या वाजवायच्या आणि छातीफाड बोलायचं असं राजकारण येणार्‍या काळात लोक जमु देणार नाहीत हे मात्र नक्की.