Football Legend Pele Died: फुटबॉलचा जादूगर पेले यांचे वयाच्या ८२व्या वर्षी निधन

Football Legend Pele Died: ब्राजिलचे स्टार फुटबॉलपटू पेले यांचे आज (३० डिसेंबर) निधन झाले आहे. ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्या मुलीने इंस्टाग्रामद्वारे त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे. पेले हे फुटबॉलविश्वातील महान खेळाडूंपैकी एक होते. काही दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते. विसाव्या शतकातील महान फुटबॉलपटू पेले हे कँसरशी झुंज देत होते, तसेच त्यांना हृदय आणि किडनीसंबंधी समस्याही होत्या. त्यांच्या मृत्यूनंतर फुटबॉलजगतातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

पेले यांची मुलगी केली नैसिमेंटो हिने इंस्टाग्रामद्वारे आपल्या वडिलांच्या निधनामी माहिती देताना लिहिले की, “आम्ही आज जे काही आहोत, ते तुमच्यामुळेच आहोत. आमचे तुमच्यावर खूप प्रेम आहे. रेस्ट इन पीस.”

पेले यांच्या नावे फुटबॉलमध्ये एकाहून एक शानदार विक्रम नोंदलेले आहेत. ते एक खेळाडूच्या रूपात विक्रमी तीनवेळा फिफा विश्वचषक (FIFA World Cup) जिंकणारे खेळाडू आहेत. त्यांनी वयाच्या अवघ्या १५व्या वर्षी सांतोस संघाकडून फुटबॉल कारकीर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर लगेचच एका वर्षाने त्यांना ब्राझिलच्या राष्ट्रीय संघात जागा मिळाली होती. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत १२७९ गोल केले होते. तसेच त्यांनी ६ वेळा ब्राजिलियन लीग आणि ३ वेळा कोपा लिबर्टाडोरेस लीगही जिंकली होती.

त्यांचे खरे नाव एडसन अरांतेस डो नैसिमेंटो होते, परंतु संपूर्ण जग त्यांना पेले या नावाने ओळखले जाते. पेले यांनी एकूण ३ लग्न केली असून त्यांना ७ मुले आहेत.