पालिकेच्या पायऱ्यावर भाजपाने सोमय्यांचा सत्कार केला, काँग्रेसने त्या पायऱ्यावर गोमूत्र शिंपडले !

पुणे : शिवसैनिकांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांना शनिवारी धक्काबुक्की केल्यानंतर हे प्रकरण चांगलेच गाजले. त्या धक्काबुक्कीत किरीट सोमय्या पालिकेच्या पायऱ्यांवर पडले होते. त्यानंतर ज्या पायऱ्यावर किरीट सोमय्या पडले होते. त्याठिकाणी भाजपातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठा राडा घातला. कॉंग्रेस या सत्काराच्या निषेधार्थ त्या पायऱ्यावर गोमूत्र आणि गुलाबपाणी टाकून भाजपच्या या स्टंटबाजीला फाटा दिला.

किरीट सोमय्यांनी यावेळी बोलताना देखील ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला. संजय राऊतांनी बेनामी कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी हट्ट केला नसता तर लोकांचा जीव वाचला असता. हात तोडा, पाय तोडा, जीव गेला तरी चालेल. काहीही करा पण किरीट सोमय्या यांना गप्प बसवा. काहीही झालं तरी आम्ही गप्प बसणार नाही. या घोटाळेबाजांना जेलमध्ये बसवणार, असा निर्धारही किरीट सोमय्यांनी केला आहे. कोविडची कमाई बंद झाल्यानंतर संजय राऊत वाईन कंपनीत कमाई करण्याचा प्रयत्न करत आहेत. सुजीत पाटकर आणि संजय राऊत यांच्या पार्टनर्शिप असल्याचा आरोपही किरीट सोमय्यांनी केला.

किरीट सोमय्यांनाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा कॉंग्रेस कडून देण्यात आला होता. त्यामुळे त्याठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला. तरीही देखील किरीट सोमय्यांना विरोधात कॉंग्रेस पक्षांने मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांच्या उपस्थित घोषणाबाजी केली. कॉंग्रेसचा हा विरोध झुगारून भाजपा कडून किरीट सोमय्यांचा सत्कार करण्यात आला.