राज्य सरकार कॅसिनो सुरु करून तरुण पिढीला बरबाद करण्याचे पाप करत आहे – नाना पटोले

मुंबई: राज्याचे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होतं आहे. या पावसाळी अधिवेशनात एकूण २४ विधेयके आणि ६ अध्यादेश मांडले जाणार आहेत. यामध्ये महाराष्ट्र ‘कॅसिनो’ नियंत्रण व कर सुधारणा विधेयकाचा समावेश असल्याने राज्यात कॅसिनोला परवानगी देण्याच्या हालचाली सुरू असल्याचे दिसून येत आहे. मात्र शिंदे सरकारच्या या निर्णयाला काँग्रेसने विरोध दर्शवला आहे.

राज्यात कॅसिनो सुरु करण्यास काँग्रेसचा विरोध
महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक लावण्याचे पाप भाजपा सरकारने केले आहे. तरुणांच्या हाताला काम नाही, बरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली असताना राज्य सरकार गोव्याच्या धर्तीवर कॅसिनो सुरु करण्याचे पाप करत आहे. आधीच किराणा दुकानात बियर विकण्यास परवानगी दिलेली आहे, मुंबईसह राज्यात डान्स बारचा सुळसुळाट आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकार कॅसिनो सुरु करून तरुण पिढीला बरबाद करण्याचे पाप करत आहे. काँग्रेस पक्षाचा राज्यात कॅसिनो सुरु करण्यास विरोध राहील, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.