दुर्दैवी! थोडक्यात हुकलं ऋतुराज गायकवाडचं शतक, गिलच्या हाती झेल देत ‘इतक्या’ धावांवर पकडला पव्हेलियनचा रस्ता

अहमदाबाद- चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स (CSK vs GT) संघात आयपीएल २०२३ चा पहिलावहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नईकडून मराठमोळा सलामीवीर ऋतुराज गायकवाड याने षटकार-चौकारांची बरसात केली. त्याच्या वेगवान खेळीमुळे अर्धशतकानंतर ऋतुराजच्या (Ruturaj Gaikwad) बॅटमधून शतकाची प्रतिक्षा होती. परंतु ऋतुराज नर्वस नाइंटिंजचा शिकार ठरला.

अल्झारी जोसेफच्या अठराव्या षटकातील पहिल्या चेंडूवर ऋतुराज झेलबाद झाला. शुबमन गिलने त्याचा झेल पकडला. त्यामुळे ९२ धावांवरच ऋतुराजच्या शानदार खेळीवर पूर्णविराम लागला. ५० चेंडूत ९ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने ऋतुराजने ही धमाकेदार खेळी केली. तसेच तो आयपीएल २०२३च्या हंगामात पहिला चौकार, पहिला षटकार आणि पहिले अर्धशतक करणारा पहिलाच फलंदाजही ठरला आहे.