ऋतुची ‘राज’ करणारी खेळी आणि धोनीचा फिनिशिंग टच! चेन्नईने गुजरातपुढे ठेवले १७९ धावांचे आव्हान

अहमदाबाद- शुक्रवारी (३१ मार्च) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स संघात आयपीएल २०२३चा पहिला सामना पार पडला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नई संघाने निर्धारित २० षटकात १७८ धावा केल्या. यादरम्यान चेन्नईने ७ विकेट्स गमावल्या. प्रत्युत्तरात आता गुजरात संघाला विजयासाठी १७९ धावांचे आव्हान मिळाले आहे.

प्रथम फलंदाजी करताना चेन्नईकडून सलामीवीर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याने धडाकेबाज खेळी केली. ५० चेंडूत ९ षटकार आणि ४ खणखणीत चौकार ठोकत त्याने ९२ धावा फटकावल्या. अठराव्या षटकात अल्झारी जोसेफच्या गोलंदाजीवर शुबमन गिलच्या हाती झेल देत ऋतुराज बाद झाला आणि त्याचे शतक हुकले. ऋतुराजव्यतिरिक्त मोईन अलीने २३ धावांची झटपट खेळी केली. तर शेवटच्या षटकांत कर्णधार एमएस धोनीने (MS Dhoni) षटकार-चौकारांची बरसात करत धावफलक हालते ठेवले. ६ चेंडूत १ षटकार आणि चौकार मारत धोनीने नाबाद १३ धावांचे योगदान दिले.