गुजरात टायटन्सची वाढली डोकेदुखी, केन विलियम्सनला गंभीर दुखापत? लंगडत गेला मैदानाबाहेर

अहमदाबाद- चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स (CSK vs GT) संघात आयपीएल २०२३ चा पहिलावहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नईकडून मराठमोळा सलामीवीर ऋतुराज गायकवाड याने षटकार-चौकारांची बरसात केली. दरम्यान ऋतुराज गायकवाडचा एक चौकार अडवताना केन विलियम्सन (Kane Williamson) दुखापतग्रस्त झाला. त्याची दुखापत गंभीर असल्याचे दिसत असल्याने गुजरात संघाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

गुजरातचा वेगवान गोलंदाज जोशुआ लिटलच्या १३व्या षटकात ही घटना घडली. जोशुआच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर सलामवीर ऋतुराजने मिडविकेटच्या दिशेने हवेत फटका मारला. यावेळी मिडविकेटवर क्षेत्ररक्षणासाठी उभा असलेल्या विलियम्सनने ही संधी साधून हवेत झेपावत झेल पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच्या पायाला झटका आला आणि तो जोराने मैदानावर पडला. आपल्या उजव्या गुडघ्याला पकडून तो वेदनेने कळवळू लागला. त्यानंतर संघाच्या मेडिकल टीमने येऊन त्याच्या दुखापतीची (Kane Williamson Injury) पाहणी केली. परंतु विलियम्सनला नीट चालताही येत नव्हते. परिणामी तो मैदानाबाहेर गेला.