पुण्यात कोरोनाचा कहर : मास्क न घालता घराबाहेर पडाल तर…

पुणे : देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरवात झाली असल्याचे देखील टास्क फोर्सने सांगितले आहे. राज्यात देखील कोरोना रुग्ण वाढीत मोठी वाढ होत आहे. त्यामुळेच मुंबई, ठाणे, नवी मुंबईमध्ये सुरु झालेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आता त्यापाठोपाठ पुण्यात देखील पहिली ते आठवीचे वर्ग बंद करण्यात येत असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

दरम्यान, उद्यापासून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेले नसल्यास, शासकीय कार्यालये हाॅटेल्स, उपहारगृहे बस इथे प्रवेश मिळणार नसल्याचे अजित पवार यांनी सांगितले. पुण्यात आज दिवसभरात 1 हजार 104 नवे रुग्ण आढळल्याने परिस्थिती अधिक चिंताजनक झाली आहे.

तर दुसरीकडे पुण्यात उद्यापासून मास्क न घातल्यास ५०० रुपये दंड आणि मास्क नसताना सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १००० रुपये दंड आकारण्याची सुचना देखील अजित पवार यांनी केली आहे. ५ जानेवारीपासून या नियमाची अंमलबजावणी होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज पुण्यात कोरोनास्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी ही घोषणा केली आहे.