नवीन संसद इमारतीवरील अशोक स्तंभाच्या सिंहावरून वाद

नवी दिल्ली– पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांनी काल ( सोमवार ११ जुलै) संसदेच्या नवीन इमारतीवरील अशोक स्तंभाचे अनावरण केले. मात्र, या अशोक स्तंभावरून आता वाद सुरू झाला आहे. दिल्लीतील संसदेच्या नवीन इमारतीवरील अशोक स्तंभाची “आक्रमक” आणि “विसंगत” प्रतिमा बसवून राष्ट्रीय चिन्हाचा अपमान केल्याचा आरोप मोदी सरकारवर केला जात आहे.

मोदी सरकारने आपल्या राष्ट्रीय चिन्हाचा, भव्य अशोक स्तंभाचा अपमान केला आहे. मूळ अशोक स्तंभ शांत, संयमी, सुंदर आणि डौलदार आहेत. तर मोदींनी अनावरण केलेला अशोक स्तंभ रागीट, असुरक्षित हिंसेचे प्रतीक वाटत आहे.असा आरोप करत विरोधकांनी केंद्र सरकारवर टीका करायला सुरुवात केली आहे.

नवीन संसद इमारतीवरील अशोक स्तंभाच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी विरोधी पक्षाांना आमंत्रित करण्यात आले नव्हते. याबद्दलही आक्षेप घेण्यात आला आहे. भारताचे राष्ट्रीय प्रतिक असलेल्या अशोक स्तंभावरील सिंहाची भावमुद्रा ही शांत, संयमी असल्याचे दिसते. तर, नवीन मुद्रा ही आक्रमक आणि क्रोधित असल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे.