Sharad Pawar | राहुल गांधीनी तुमचं काय घोडं मारलंय; शरद पवार यांचा मोदींना थेट सवाल 

Sharad Pawar | लोकांच्या हितासाठी सत्ता वापरायची असते पण याची जाणीव आज सत्ताधाऱ्यांना नसल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यानी पंतप्रधान मोदींवर केला आहे. माढा लोकसभेचे उमेदवार धैर्यशिल मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची सभा आज अकलूजमध्ये पार पडली आहे. या सभेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार , प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार राजेश टोपे आदी नेते उपस्थित होते.

शरद पवार साहेब म्हणाले की, आज अनेकजण वयाचा मुद्दा उपस्थित करतात. लोकशाहीमध्ये काम करण्याची हिंमत पाहिजे. उदाहरण द्यायचे झाल्यास मी वयाच्या २६ वर्षी विधानसभेत निवडून गेलो. वयाच्या २७ व्या वर्षी मंत्रिमंडळात होतो त्यानंतर  ३७ व्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो असेही शरद पवार साहेब यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

शरद पवार म्हणाले की,माझ्या राजकारणाच्या सुरुवातीच्या काळात मी अकलूजला येत असे. त्यावेळी माझे मोठे भाऊ आप्पासाहेब पवार हे त्यावेळी शंकरराव मोहिते-पाटील यांच्याबरोबर काम करत होते. त्या दोघांच्या मनात एकच विचार असायचा. या परिसराचा विकास कसा करायचा? शंकरराव मोहिते यांनी आयुष्यभर विकासासाठी काम केले. त्या काळात दुष्काळ असायचा. पाण्याचा प्रश्न असायचा, कारखान्याचे प्रश्न असायचे, असे अनेक चांगले काम आयुष्यभर त्यांनी केले असेही शरद पवार साहेब यांनी यावेळी सांगितले.

पुढे शरद पवार म्हणाले की, आज जिरायत शेतीकडे राज्यकर्त्यांचे काहीच लक्ष नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी माळशिरसला आले होते. निवडणुकीमुळे एक बरे झाले की, देशाच्या पंतप्रधानांना माळशिरस, सोलापूर, पुणे माहिती तरी झाले. आम्ही कधीतरी ऐकायचो की जवाहरलाल नेहरू यांची कधीतरी सोलापूरला सभा होत असायची. आता नरेंद्र मोदी आठवड्याला येत आहेत. पंतप्रधान हे देशाचे असतात. मात्र, आता आपण पाहत आहोत की, देशाचे पंतप्रधान हे आठवडामंत्री झाले आहेत. दर आठवड्याला इकडे येत आहेत पंतप्रधान मोदींना आमची विनंती आहे की, त्यांनी इकडे येत असताना विमानाने किंवा हेलिकॉप्टरने येऊ नये, तर गाडीने यावे. कारण इकडचे रस्ते तरी व्यवस्थित होतील. असेही शरद पवार म्हणाले.

शरद पवार म्हणाले की, पंतप्रधानांना मूळ गोष्टी समजत नाही, नको ते बोलतात. आपण हळूहळू हुकूमशाहीकडे चाललो आहे. काही झालं तरी चालेल पण हुकूमशाही आली न पाहिजे, यासाठी आपण सर्वांनी लढलं पाहिजे. पंचायत समितीच्या, ग्रामपंचाईतीच्या निवडणूका का होत नाहीत? असा सवाल पवार  साहेबांनी उपस्थित केला. लोकशाही संस्था उद्धवस्थ करायच्या ही मोदींची गॅरंटी आहे. मोदी सत्तेवर राहणार नाहीत यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तसेच जवाहरलाल नेहरु यांच्यावर देखील टीका केली जातेय. ते आज हयात नसताना त्यांच्यावर टीका कशासाठी करायची असा सवालही पवार साहेबांनी उपस्थित केला आहे.

यावर सविस्तर बोलताना पवार म्हणाले की, पंतप्रधान हा देशाचा असतो. आम्ही संरक्षण मंत्री असताना कारखाने काढले. ते फक्त महाराष्ट्रात नाही तर विविध राज्यात काढले. त्याठिकाणच्या मुलांना हाताला काम दिले. मात्र आज महाराष्ट्रात कोणताही प्रकल्प आला की गुजरातला जातो. अशी भूमिका देशाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्याला शोभत नाही. असेही शरद पवार साहेब म्हणाले.

शरद पवार म्हणाले की, असत्य बोलणं हे मोदी साहेबांचं वैशिष्ट्य आहे. आज प्रधानमंत्री कुठेही गेले तरी राहुल गांधींवर टीका करतात. त्यांनी तुमचं काय घोडं मारलयं. आज एक तरुण कन्याकुमारीपासून यात्रा काढतो. लोकांना समजून घेतो. मात्र पंतप्रधान त्यांच्यावर टीका करतात. त्यासोबत नेहरुंवरही टीका करतात. नेहरु आज हयात नाहीत, आज कशासाठी त्यांना शिवीगाळ करायची? त्यांच्यावर कशासाठी टीका करायची? असेही शरद पवार साहेब म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narendra Modi | “घाबरू नका, पळू नका”, राहुल गांधींना रायबरेलीतून उमेदवारी मिळाल्यानंतर नरेंद्र मोदींचा खोचक टोला

Murlidhar Mohol | पुणे रेल्वे स्थानकाचा होणार विस्तार अन्य शहरांशी वाढणार कनेक्टिव्हिटी

Chitra Wagh | मोठ्या ताईंचा एकेक व्हिडिओ पाहून हसू येतं, त्यांचं मानसिक संतुलन ढासळलंय