Eknath Shinde | पोर्शे हिट अँड रन प्रकरणात जामीन मिळाला असला तरीही दोषीवर कारवाई करणारच

Eknath Shinde | पुणे पोर्शे हिट अँड रन प्रकरणात मृत्यूमुखी पडलेला तरुण आणि तरुणीच्या पालकांना विशेष बाब म्हणून देण्यात आलेल्या 10 लाखांचा धनादेश त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते सुपूर्द करण्यात आला. या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला कोर्टाने जामीन मंजूर केला असला तरीही या प्रकरणातील दोषींवर कारवाई करणारच असे सांगून मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde ) यांनी या मुलांच्या पालकांना आशवस्त केले.

पुण्यातील पोरशे हिट अँड रन प्रकरणात मृत्यू झालेला तरुण अनिश अवधियाचे वडील ओमप्रकाश अवधिया आणि तरुणी अश्विनी कोष्टाचे वडील सुरेश कोष्टा यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट घेतली होती.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी त्याना न्याय मिळवून देण्यासाठी दोषींवर कठोर कारवाई करू तसेच या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू असे सांगितले होते. तसेच मध्य प्रदेशचे रहीवाशी असूनही त्यांना झालेल्या वैयक्तिक नुकसान पाहता सहवेदना व्यक्त करण्यासाठी त्याना राज्य शासनाकडून विशेष बाब म्हणून 10 लाख रुपयांची मदत म्हणून देण्याचे जाहीर केले होते. आज सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या मदतीचे धनादेश त्यांच्या हाती सुपूर्द करण्यात आले.

यावेळी या दोन्ही मुलांच्या पालकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र शासनाचे आभार मानले. तसेच आपल्या मुलांना न्याय मिळवून देण्यासाठी हे प्रकरण नव्याने हाती घेत सर्व दोषींवर कारवाई केल्याबद्दल महाराष्ट्र पोलिसांचेही आभार मानले.

यावेळी मंत्री संजय राठोड, मुख्य सचिव डॉ. नितीन करीर,मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव विकास खारगे तसेच पुणे युवासेना सचिव किरण साळी आणि पीडित कुटूंबातील अन्य सदस्य उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप