Elections Results 2024। आढळरावांचा ‘तो’ निर्णय चुकलाच; भोसरीसह शिरुरमध्ये मतदारांनी ‘घड्याळ’ नाकारले!

पुणे | लोकसभा निवडणूक (Elections Results 2024) मतमोजणीतील शेवटच्या चरणातील मतमोजणीचा कल समोर आला. राज्यात आणि केंद्रात ‘इंडिया आघाडी’ची मुसंडी असून, तसेच चित्र शिरुर लोकसभा मतदार संघात आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांचा विजय निश्चित झाला आहे, तर महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांच्या पराभवावर शिक्कामोर्तब झाले आहे.

ऐन लोकसभा निवडणुकीच्या (Elections Results 2024) तोंडावर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिवसेना शिंदे गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) प्रवेश केला. राष्ट्रवादी आणि पवार कुटुंबियांचा कट्टर विरोधक म्हणून आढळराव पाटील यांची ओळख होती. किंबहुना, राष्ट्रवादीच्या विरोधातील मतदार आढळरावांच्या पाठिशी होता. मात्र, या निवडणुकीत तिकीटाच्या रस्सीखेचमध्ये आढळरावांना ‘घड्याळ’ हातावर बांधावे लागले.

मतदार संघातील खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरुर, हडपसर आणि भोसरी अशा सहापैकी ४ मतदार संघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार असतानाही आढळराव यांना पिछाडीवर रहावे लागले आहे. डॉ. अमोल कोल्हे यांच्या विरोधात रान पेटवणारे राष्ट्रवादीचे दिग्गज आमदार दिलीप मोहिते यांना खेडमध्ये मताधिक्य देता आले नाही, अनेक वर्षे कॅबिनेट मंत्री राहिलेले दिलीप वळसे-पाटील आंबेगावमधून ‘सपशेल फेल’ ठरले आहेत. जुन्नरमधील आमदार अतूल बेनके, हडपसरचे आमदार चेतन तुपे यांना डॉ. कोल्हे यांचा वारे रोखता आला नाही.

दरम्यान, मावळप्रमाणे आढळराव पाटील यांनी ‘धनुष्यबाण’ चिन्हावर ही निवडणूक लढवली असती, तर आढळराव पाटील यांना फायदा झाला असता. कारण, राष्ट्रवादीच्या ‘घड्याळ’ चिन्हाला मतदारांनी नाकारले. भोसरी वगळत सर्वच विधानसभा मतदार संघात आढळराव पाटील पिछाडीवर राहिले आहेत. परिणामी, आढळरावांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील प्रवेश मतदार आणि कार्यकर्त्यांनाही रुचलेला नाही, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

भोसरीत महेश लांडगेंची एकाकी झुंज…
भोसरी विधानसभा मतदार संघात आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून आढळराव पाटील यांच्या विजयासाठी भाजपाने एकाकी झुंज दिली. शेवटच्या सत्रातील मतमोजणीपर्यंत सुमारे १० हजार मतांचे मताधिक्य भोसरीतून आढळराव पाटील यांना मिळाले आहे, असे आकडेवारीतून दिसते. राष्ट्रवादी अजित पवार गटातील नाराजीची फटका महायुतीला बसला. अजित पवार गटातील मातब्बर नेत्यांनी ‘तुतारी’ चालवली. ‘माळी-मराठा’ असे कार्डही मोठ्या प्रमाणात चालले. विशेष म्हणजे, गेल्या दोन- अडीच वर्षांपासून महापालिका निवडणूक लांबणीवर पडल्यामुळे माजी नगरसेवक आणि इच्छुकांनीही या निवडणुकीत ‘तटस्थ’ राहण्याची भूमिका घेतली. भाजपा विरोधातील ‘अँटिइंकम्पन्सी’ आणि महायुतीमध्ये नाराजी यामुळे भोसरीत महेश लांडगे यांना एकाकीपणे खिंड लढवावी लागली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप