कालीचरण महाराजांवर देशद्रोहाखाली गुन्हा दाखल करा; सचिन खरात यांची मागणी

पुणे – छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे आयोजित धर्मसंसद 2021चा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात आला आहे. याठिकाणी धर्मसंसदेच्या (Dharm Sansad 2021) शेवटच्या दिवशी कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरत देशाच्या फाळणीसाठी बापूंनाही जबाबदार धरलं. यानंतर कालीचरण यांच्यावर रायपूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महात्मा गांधींना अकोल्याच्या कालीचरण महाराजांनी अक्षरश: शिव्यांची लाखोली वाहिली आहे. यावेळी त्यांनी अत्यंत हीन दर्जाचे असे शब्द वापरले आहेत. कालिचरण महाराजाच्या या विधानामुळे आता बराच वाद पेटला आहे.

कालिचरण महाराज हे फक्त गांधीजींना शिविगाळ करुन थांबले नाहीत तर गांधीजींची हत्या करणाऱ्या नथूराम गोडसेचेही त्यांनी आभार मानले आहेत. त्याच्या कृतीचं चक्क कौतुक केलं आहे. यानंतर काँग्रेसच नाही तर अनेक सामाजिक, राजकीय व्यक्तींनी कालीचरण महाराजाविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करण्याची मागणी केलीय.

दरम्यान, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात)चे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी या मुद्द्यावर अतिशय संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र राज्यातील अकोला येथील कालिचरण महाराज या व्यक्तीने गांधीजी यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत टीका केल्याचे दिसत आहे या टिकेचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्ष निषेध करत असून हा व्हिडीओ सोशल मीडियात फिरताना दिसत आहे त्यामुळे या व्हिडीओची पडताळणी करून या कालीचरण महाराज वर देशद्रोहाखाली गुन्हा दाखल करावा अशी मागणी राज्य सरकारला करत आहे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.