बाळाच्या विकासासाठी जीवनातील पहिले एक हजार दिवस महत्वाचे

सोलापूर :- बाळाच्या योग्य वाढ व विकासासाठी बाळाच्या जीवनातील पहिले एक हजार दिवसात मातेच्या आहाराची व बाळाच्या पोषणाची सर्वांगीण काळजी घेणे गरजेचे आहे. या कालावधीत बाळाची शारीरिक वाढ व बौद्धिक विकास अत्यंत जलद गतीने होतो असे युनिसेफ सल्लागार डॉ.पांडुरंग सुदामे यांनी सांगितले.

स्तनपान सप्ताह निमित्त जिल्हा परिषदेच्या यशवंतराव सभागृहात जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी काकटकर तालुका आरोग्य अधिकारी ,जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरगले आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. सुदामे म्हणाले, स्तनपान योग्य पद्धतीने केले तर बालमृत्यू व कुपोषण टाळता येऊ शकते. त्यासाठी गरोदर व स्तनदा मातांनी योग्य पोषक आहार घ्यायला हवा. गरोदरपणात योग्य आहार घेतल्याने बाळाच्या मेंदुच्या वाढीबरोबरच शरीराच्या इतर अवयवांचाही विकास होतो. अधिक काळ स्तनपान झालेल्या बाळाच्या मेंदूचा विकास आणि एकूणच वाढ चांगल्या प्रकारे होण्यास मदत होते. बाळांना संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण देण्याचे काम आईच्या दुधातील पोषणमूल्ये करतात. बाळाच्या वाढ व काळजी घेण्यासाठी दर दोन तासांनी स्तनपान केले पाहिजे. बालमृत्यू कमी होण्याबाबत समाजात जनजागृती करणे आवश्यक असल्याचे युनिसेफ सल्लागार डॉ. सुदामे यांनी सांगितले.

गरोदर मातांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात नाव नोंदणी करावी. दिवसभरातून किमान चार वेळा पौष्टिक आहार, डॉक्टरांचा सल्ल्याने औषधी घ्यावी. प्रसुती रुग्णालयातच करावी. शासकीय योजनांचा अवश्य लाभ घ्यावा. तसेच जिल्ह्यातील अंगणवाडी स्तरावर स्तनपान सप्ताह दरम्यान पालक सभा, माता सभांचे आयोजन करून स्तनपानाचे महत्त्व तसेच स्तनपान बाबत असणारे गैरसमज, नवजात शिशु स्तनपान करावयाच्या आदर्श पद्धती याबाबत मार्गदर्शन सत्राचे आयोजन करावे असे मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी सांगितले.