Raigad LokSabha | ”सत्ता हे उपभोगण्याचे साधन असू शकत नाही तर सत्ता हे लोकांची सेवा करण्याचे प्रभावी साधन”

Raigad LokSabha | सत्ता हे उपभोगण्याचे साधन असू शकत नाही. सत्ता हे लोकांची सेवा करण्याचे प्रभावी साधन आहे ही भावना घेऊन सुनिल तटकरे (Sunil Tatkare) रोहेकरांसाठी काम करत आला मी मेहरबानी केली नाही आणि उपकारही केले नाही. रोहेकरांचे माझ्यावर अगणित असे उपकार आहेत म्हणून मी आज देशाच्या सर्वोच्च मंदिरामध्ये पाच वर्षे तुमच्या आशिर्वादाची… तुमच्या प्रेमाची… तुमच्या शक्तीची झालर माझ्या अंगावर होती म्हणून काम करु शकलो अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा (Raigad LokSabha) मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

शनिवारी रात्री आठ वाजता रोहा शहरातील महायुतीच्या जाहीर प्रचार सभेत राममंदिराच्या परिसरात सुनिल तटकरे यांनी रोहेकरांचे आशिर्वाद घेतले. हनुमानाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेत हीच ताकद पाठीशी उभी ठेव असे साकडेही घातले.

५५ वर्षापूर्वी शिक्षणाच्या निमित्ताने रोहयात आलो होतो असे सांगतानाच माणूस किती मोठा झाला यावर त्याची गुणवत्ता ठरत नाही. अनेकांना मोठया पदावर जाण्याची संधी मिळत असते मोठया पदावर गेल्यानंतर ज्या गावाने वैभव दाखवले ज्या गावाने चालण्याची…प्रगती करण्याची… जनतेसाठी झटण्याची शिकवण दिली. ज्यातून संस्कारमय जीवनाचा वैचारिक पाया रचला त्या गावाच्या प्रतिष्ठेला धक्का लागणार नाही असे काम केल्याची आठवणही सुनिल तटकरे यांनी सांगितली.

सत्ता हे उपभोगण्याचे साधन असू शकत नाही. सत्ता ही लोकांची सेवा करण्याचे प्रभावी साधन आहे. ही भावना घेऊन सुनिल तटकरे रोहेकरांसाठी काम करत आला आहे मी मेहरबानी केली नाही असे सांगतानाच मला सर्व निवडणुकीत रोहेकरांची साथ, आशिर्वाद मिळाला आहे. पाच वेळा आमदार, खासदार आणि ज्या ज्या पदावर गेलो त्या पदावर मी माझं रोहा गाव लहानपणापासून जे अनुभवले, शिकलो, वावरलो त्या माझ्या गावाला इतर गावांच्या तुलनेत बरोबरीने नेले पाहिजे या समर्पित भावनेने काम केले. मला अभिमान आहे वाटतोय की, १९८९ मध्ये रोहयात पूर आला त्यावेळी हे माझं गाव पुराने वेढले होते मात्र तेवढाच पाऊस आज पडूनही एक थेंब गावात आला नाही. कुंडलिकाचे संवर्धन केले हे पाप केले की पुण्य केले हे तुम्ही ठरवा अशा शब्दात रोहेकरांना आवाहन सुनिल तटकरे यांनी केले.

आम्ही भाजप आणि इतर पक्षासोबत एकाच व्यासपीठावर कसे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल पण या देशात ध्रुवीकरण होतेय. या देशात अनेक राजकीय सरकारे आली. भिन्न विचारसरणीची सरकारे एकत्र येऊ शकतात. होय आम्ही अजितदादांच्या नेतृत्वाखाली निर्णय घेतला, राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून घेतला आणि संघ राज्याची संकल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिली आणि त्यात राज्य आणि देशाने समन्वयाने काम केले पाहिजे हे संविधानात स्पष्ट केले आहे. बहुजनांच्या हितासाठी तुम्ही सरकारमध्ये असले पाहिजे असा विचार यशवंतराव चव्हाणसाहेबांनी दिल्याचेही सुनिल तटकरे म्हणाले.

अनंत गीते… निवडणूका लढवा जय – पराजय कोणाचाही होईल परंतु याच अंतुलेसाहेबांनी महाराष्ट्राला नेतृत्व देत रायगडचा पहिला हिरा… छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडमधील मावळा अंतुले यांच्या रुपाने महाराष्ट्राचा सर्वात गतीमान मुख्यमंत्री पाहिला याचा मला अभिमान आहे. त्यांना तुम्ही हिरवा साप अशी उपमा देता ही २००९ मधील तुमची भाषणे आहेत. आणि आज त्या मुस्लिम समाजाची मते मागता तुमच्या मनात या समाजाबद्दल द्वेष असेल तर तुम्हाला त्यांची मते मागण्याचा अधिकार नाही असे सुनिल तटकरे यांनी ठणकावून सांगितले.

निवडणूका येतील – जातील… हार – जीत होत राहिल… सरकारे बदलली जातील… परंतु ज्या मुळ पायावर या देशाचे सार्वभौमत्व टिकून राहिलंय ते संविधान बदलले जाणार अशी आवई विरोधक उठवत लोकांची दिशाभूल करत आहेत परंतु दिनांक ४ जूनला निवडणूकीचा जेव्हा निकाल लागेल तेव्हा संविधानाच्या नावाने ओरड करणारे हे लोक कुठे दिसणार नाहीत असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

२७ पक्ष नेहमी एकमेकांच्या विरोधात ठाकले तेच अनेक पक्ष कॉंग्रेस पक्षाला विरोध करण्यासाठी एकत्र आले ते आज इंडी आघाडी नावाने लोकशाही धोक्यात आल्याची ओरड करत आहेत. जेव्हा देशात अस्थिरता असते त्यावेळी बाहयशक्ती देशाची अंतर्गत सुरक्षा व्यवस्था भेदू शकते परंतु अंतर्गत सुरक्षा व्यवस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इतकी मजबूत केली आहे की बाह्यशक्ती आज वाकड्या नजरेने बघू शकत नाही असा विश्वासही सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.

देशाच्या अर्थव्यवस्थेत कमालीचे बदल झाले आहेत. माझ्या रोहयात त्याकाळी एक मेडिकल होते आज मोजता येणार नाही इतकी मेडिकल निर्माण झाली आहेत. यापूर्वी एक हॉटेल होते आज कितीतरी हॉटेल झाली आहेत. ही माणसं आज अर्थव्यवस्था चालवत आहेत. आज जगाच्या पाठीवर देशाची अर्थव्यवस्था झपाटयाने विकसित होत असताना तुमची – माझी जबाबदारी हीच आहे की, देशाची एकात्मता , अखंडता टिकवण्याची ऐतिहासिक जबाबदारी तुम्हाला – मला घ्यायची आहे असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.

या देशाची संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था सिध्दांतावर मजबूतपणे उभी आहे. त्याची वाटचाल करण्यासाठीच तुमच्या या रोहेकराला पुन्हा एकदा अठराव्या लोकसभेत जाण्याची संधी द्या असे आवाहनही सुनिल तटकरे यांनी केले.

या जाहीर सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील, महिला नेत्या सुरेखाताई ठाकरे, आदींसह महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप, मनसे आणि आरपीआयचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narendra Modi | “घाबरू नका, पळू नका”, राहुल गांधींना रायबरेलीतून उमेदवारी मिळाल्यानंतर नरेंद्र मोदींचा खोचक टोला

Murlidhar Mohol | पुणे रेल्वे स्थानकाचा होणार विस्तार अन्य शहरांशी वाढणार कनेक्टिव्हिटी

Chitra Wagh | मोठ्या ताईंचा एकेक व्हिडिओ पाहून हसू येतं, त्यांचं मानसिक संतुलन ढासळलंय