Gautam Gambhir | कर्णधार म्हणून सूर्यकुमारमधील क्षमता ओळखायला चुकलो, गौतम गंभीरचा वाटतेय या गोष्टीची खंत

Gautam Gambhir | भारतीय संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) दीर्घकाळापासून आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स कडून खेळत असून, तो संघाची फलंदाजी केवळ मजबूत करत नाही तर नेतृत्व करण्याची क्षमताही त्याच्यात आहे. मुंबईतील चमकदार कामगिरीनंतर सूर्यकुमार यादवचा भारताच्या मर्यादित षटकांच्या संघात समावेश करण्यात आला असून तो आता आयसीसी टी20 क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. मुंबईपूर्वी, सूर्यकुमार 2014 ते 2017 पर्यंत कोलकाता नाईट रायडर्सकडून (KKR) खेळला होता. त्यावेळी केकेआरचा कर्णधार असलेल्या गौतम गंभीरने (Gautam Gambhir) आता खुलासा केला आहे की, त्याला सूर्यकुमारची क्षमता न ओळखल्याबद्दल खेद वाटतो.

सूर्यकुमारने आपल्या करिअरची सुरुवात मुंबईतून केली
सूर्यकुमारने 2012 मध्ये त्याच्या आयपीएल कारकिर्दीला सुरुवात केली होती, परंतु त्या मोसमात त्याने मुंबईसाठी एकच सामना खेळला होता. यानंतर मुंबईने सूर्यकुमारला सोडले आणि 2014 मध्ये तो केकेआरमध्ये सामील झाला. सूर्यकुमारच्या पहिल्याच हंगामात केकेआरने गंभीरच्या नेतृत्वाखाली आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. सूर्यकुमार चार वर्षे केकेआरसोबत राहिला आणि त्याने 54 सामन्यांमध्ये 608 धावा केल्या, परंतु त्याच्या बहुतेक धावा खालच्या क्रमाने फलंदाजी करताना आल्या.

‘सूर्यकुमारची बॅटिंग लाईनअप ठरवू न शकल्याची खंत’
आपल्या कर्णधारपदाखाली केकेआरला दोनदा आयपीएल विजेतेपद मिळवून देणाऱ्या गंभीरने कबूल केले की त्याच्या कार्यकाळात सूर्यकुमारची क्षमता आणि फलंदाजी लाइनअप निश्चित करण्यात त्याला अद्याप खेद वाटतो. गंभीर म्हणाला, सर्वोत्तम क्षमता ओळखून ती जगासमोर आणणे ही नेत्याची भूमिका असते. माझ्या सात वर्षांच्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीत मला एका गोष्टीची खंत वाटते ती म्हणजे सूर्यकुमारच्या क्षमतेचा योग्य वापर करू शकलो नाही. या कारणासाठी आम्ही त्याला कॉम्बिनेशनमध्ये खालच्या स्थानावर उभे करायचो. तुम्ही तिसऱ्या क्रमांकावर एकच खेळाडू उतरवू शकता आणि एक कर्णधार म्हणून तुम्हाला प्लेइंग-11 मधील इतर 10 खेळाडूंचाही विचार करावा लागेल. सूर्यकुमार तिसऱ्या क्रमांकावर चांगला खेळला, पण सातव्या क्रमांकावरही तो त्याच पद्धतीने फलंदाजी करायचा.

गंभीरने सूर्यकुमारचे कौतुक केले
गंभीरने सूर्यकुमारची टीममेट म्हणून प्रशंसा केली आणि 2015 मध्ये त्याला संघाचा उपकर्णधार का बनवले हे सांगितले. गंभीर म्हणाला, सूर्यकुमार हा संघासाठी समर्पित खेळाडू आहे. कोणीही चांगला खेळाडू होऊ शकतो, पण संघासाठी समर्पित राहणे हे कठीण काम आहे. तुम्ही त्याला सहाव्या किंवा सातव्या क्रमांकावर खेळा किंवा त्याला अकरापैकी बाहेर सोडा, तो नेहमी हसतमुख आणि संघासाठी कामगिरी करण्यास तयार असतो. त्यामुळेच आम्ही त्याला उपकर्णधारपदी नियुक्त केले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप