मी जनतेचे काम करतोय, भ्रष्टाचार बाहेर काढतोय, ते मी करीतच राहणार; फडणविसांचा निर्धार

मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवून फोन टॅपिंग प्रकरणी रविवारी बीकेसीतील सायबर पोलीस ठाण्यात जबाबासाठी बोलावले होते. मात्र त्यानंतर फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन पोलिसांनी जबाब नोंदवला आहे.

दरम्यान, यानंतर फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत आपली बाजू जनतेसमोर माडली.फडणवीस म्हणाले, महाविकास आघाडीने पोलिस बदल्यांमध्ये जो महाघोटाळा केला, त्याची माहिती मी केंद्रीय गृहसचिवांना दिली होती. त्या प्रकरणात आधी हायकोर्ट आणि नंतर सुप्रीम कोर्टाने सीबीआय चौकशी जाहीर केली. मी बोललो नसतो, तर कोट्यवधींचा हा महाघोटाळा बाहेर आलाच नसता.

महाविकास आघाडीचे भाजपा नेत्यांविरोधातील षडयंत्र नुकतेच विधानसभेत उघडकीस आणल्यानंतर अचानक मला काल हजर राहण्याची नोटीस आली. त्यानुसार, मी पोलिस ठाण्यात हजर राहणार असल्याची घोषणा सुद्धा केली. मात्र, नंतर सरकारनेच विनंती केल्याने पोलिस घरी आले. आधी मला काही प्रश्न पाठविण्यात आले होते. पण, आज घेऊन आलेल्या प्रश्नांमध्ये गुणात्मक अंतर होते. जणू मला आरोपी-सहआरोपी करता येईल काय, असे ते होते.

मी एका जबाबदार नेत्यासारखे वागलो. जेव्हा हा घोटाळा उघडकीस केला, तेव्हा माध्यमांमध्ये घोषणा करून ही संपूर्ण माहिती-पुरावे केंद्रीय गृहसचिवांना दिले. कारण, महाविकास आघाडी सरकारने केलेल्या घोटाळ्याचे पुरावे त्यांना देऊन काहीच उपयोग नव्हता.

या संपूर्ण प्रकरणात मी ‘व्हीसल ब्लोअर’चे काम केले. मात्र, आता ऑफिशियल सिक्रसी अ‍ॅक्टनुसार मला आरोपी करता येईल काय, असा प्रयत्न होतोय. खरे तर जे पुरावे मी दिले नाहीत, ते मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकारांना दिले आणि त्याचेही पुरावे माझ्याकडे आहेत.

मला कितीही गोवण्याचा प्रयत्न केला, तरी मी थांबणार नाही. मी घोटाळे बाहेर काढतच राहणार. मी जनतेचे काम करतोय्, भ्रष्टाचार बाहेर काढतोय्, ते मी करीतच राहणार. मला अडकविण्याचे त्यांचे मनसुबे पुरे होऊ शकणार नाहीत. असं ते म्हणाले.