माझा मुलगा शिंदे गटात गेला तरी बाळासाहेब, उद्धवसाहेब व मातोश्रीशी असलेली माझी निष्ठा तशीच अढळ राहील – देसाई

Mumbai – माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे सुपुत्र भूषण देसाई यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशकेला आहे. या प्रवेशाला खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. भूषण देसाई एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वातील शिवसेनेत प्रवेश केल्याने हा ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे.( Bhushan Desai joins Shivsena ).

सुभाष देसाई हे बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे विश्वासू नेते म्हणून ओळखले जातात. मात्र, सुभाष देसाईंचा मुलगा भूषण देसाई आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेत गेला आहे. भूषण देसाई यांच्या निर्णयामुळं शिवसेनेतल्या फुटीनंतर आणखी एका घरात फूट पडल्याचं दिसून येत आहे.

या सर्व घडामोडींवर आता सुभाष देसाई यांनीही भाष्य केले असून आपली भूमिका जाहीर केली आहे. ते म्हणाले, माझा मुलगा भूषण देसाई याने आज शिंदे गटात प्रवेश केला ही घटना माझ्यासाठी क्लेशदायक आहे. त्याचे शिवसेनेत किंवा राजकारणात कोणतेच काम नाही. त्यामुळे त्याच्या  कुठल्याही पक्षात जाण्याने शिवसेनेवर अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही.

शिवसेना, वंदनीय  बाळासाहेब, उद्धवसाहेब व मातोश्रीशी मागील पाच दशकांहून अधिक काळापासून असलेली माझी निष्ठा तशीच अढळ राहील. वयाच्या या टप्प्यावर मी खूप काही करण्याची घोषणा करणार नाही. मात्र इथून पुढेसुद्धा संपूर्ण न्याय मिळेपर्यंत व शिवसेनेचे गतवैभव  परत मिळेपर्यंत मी असंख्य शिवसैनिकांच्या सोबतीने माझे  कार्य सुरु ठेवणार आहे.असं देसाई यांनी म्हटले आहे.