आताची राष्ट्रवादी ही साहेबांची राष्ट्रवादी नाही हेच खरयं – चित्रा वाघ

पुणे – केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Union Minister Smriti Irani) यांच्या पुण्यातील कार्यक्रमामध्ये मोठा गोंधळ निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. स्मृती इराणी यांच्या बालगंधर्व रंगमंदिरातील कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या नेत्या वैशाली नागवडे यांना मारहाण करण्यात आली असा आरोप होत आहे. दरम्यान, आता मारहाण  केल्याचा आरोप असणाऱ्या भाजपाच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. भाजपाच्या तीन कार्यकर्त्यांवर डेक्कन पोलीस ठाण्यात मारहाण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्मृती इराणी प्रमुख पाहुण्या असलेल्या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरु केल्याने सभागृहामध्ये अभूतपूर्व गोंधळ झाला. यामध्येच राष्ट्रवादीच्या माहिलांना भाजपा कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आल्याचा दावा राष्ट्रवादीने केलाय. या प्रकरणामध्ये तक्रारही दाखल करण्यात आली होती. याच तक्रारीची दखल घेत डेक्कन पोलिसांनी भस्मराज तीकोने ( रा.कसबा पेठ ) , प्रमोद कोंढरे( रा. नातू बाग), मयूर गांधी (शुक्रवार पेठ,) या भाजपाच्या तीन कार्यकर्त्यांविरोधात मारहाण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखला केलाय.दरम्यान, आता या प्रकरणावरून राष्ट्रवादी – भाजपा आमनेसामने आले आहेत.

याबाबत बोलताना राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप म्हणाले,  राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या विभागीय अध्यक्षा सौ. वैशालीताई नागवडे यांना भारतीय जनता पार्टीच्या काही कार्यकर्त्यांनी केलेली मारहाण दुर्दैवी असून , या घटनेचा पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तीव्र शब्दात निषेध करते. मुळात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या संस्कार व पक्षाची संस्कृती या निमित्ताने सर्वांसमोर आली , असून आमचा महाराष्ट्र पोलिस प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे. पोलिस प्रशासनाने तात्काळ संबंधित आरोपींना अटक करत कठोर कायदेशीर पावले उचलावीत.

पक्ष शिस्तीची टिमकी मिरवणाऱ्या देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील महिलांच्या मारहाणीची ही शिकवण देतात का तुम्ही शाखेत. चित्रा वाघ आता या महिला भगिनीच्या मागे तुम्ही उभ्या राहणार का..? सौ.वैशालीताई नागवडे यांना उपचारार्थ ससून हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. असं त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या या टीकेला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या, कार्यक्रमासाठी नाही तर भाजपाचा कार्यक्रम उधळायला आलेल्या..अंडी फेकायला आलेल्या महिलांची आरती करायची असं म्हणायचं आहे का तुम्हाला..? दस्तुरखुद्द शरद पवार साहेबांनाही हा प्रकार नक्कीचं आवडला नसेल ह्याची मला खात्री आहे. आताची राष्ट्रवादी ही साहेबांची राष्ट्रवादी नाही हेच खरयं…