चित्रा वाघ यांच्या खांद्यावर भाजपने सोपविली आता ‘ही’ मोठी जबाबदारी

मुंबई: भारतीय जनता पार्टीने पक्षाचा आक्रमक चेहरा अशी ओळख असलेल्या चित्रा वाघ यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. चित्रा वाघ यांची महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांविरोधात चित्रा वाघ आक्रमक भूमिका घेत असल्याने त्यांनी संधी मिळाली असल्याची शक्यता आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी पत्रकार परिषदेत चित्रा वाघ यांच्या नावाची घोषणा करत नियुक्तीचे पत्र दिले. त्यानंतर पक्षातील नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

चित्रा वाघ यांच्यापूर्वी उमा खापरे (Uma Khapre) यांच्याकडे महिला मोर्चाची धुरा होती. खापरेंची विधानपरिषदेवर वर्णी लागल्यानंतर त्यांच्याकडील भार हलका करण्यात आला आहे.

चित्रा वाघ यांना ही जबाबदारी मिळाली असली, तरी भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना पक्षाने पुन्हा एकदा डावलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात स्थान न मिळाल्याने पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा होत्या. पंकजांनी आपली नाराजी कधी उघड, तर कधी सांकेतिक पद्धतीने व्यक्त केली होती.