प्रत्येक शहरात एक आनंद दिघे हवा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं ‘धर्मवीरचं’ कौतुक !

मुंबई – धर्मवीर मुक्काम पोष्ट ठाणे (Dharmaveer Mukkam Post Thane) हा चित्रपट सध्या सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे. शिवसेनेचे लोकप्रिय नेते आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. चित्रपट आवडल्याच्या प्रतिक्रिया सर्वसामान्य प्रेक्षकांकडून येतच आहेत, अशातच आता एक विशेष प्रतिक्रिया आली आहे ज्यामुळे चित्रपटाच्या टीमचा उत्साह दुणावला आहे. ही प्रतिक्रिया आहे राज्याचे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) cयांची. काल रात्री हा चित्रपट बघितल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, सर्वसामान्यांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने ‘आनंद’ घेऊन येणारे व्यक्तिमत्व म्हणजे आनंद दिघे ! गुरुप्रति, पक्षाप्रति निष्ठा म्हणजे आनंद दिघे ! गुंडावरती वचक, दरारा म्हणजे आनंद दिघे. त्यांच्या या कर्तृत्वामुळेच प्रत्येक शहरात एक आनंद दिघे असावा असं मनोमन वाटत आहे. हा चित्रपट बघून मी अतिशय भारावून गेलो आहे. प्रसाद ओक यांनी आनंद दिघे यांची व्यक्तिरेखा, त्यांच्या लकबी, बारीक सारीक गोष्टी एवढ्या उत्तमरीत्या साकारल्या आहेत की पडद्यावर चित्रपट बघतोय असं वाटतच नाही.

प्रसाद यांनी आपल्या भूमिकेतून आनंद दिघे यांना जणू काही पुन्हा एकदा जिवंत केलं आहे. आनंद दिघे यांचं शिवसेनेवर आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंवर (Shiv Sena chief Balasaheb Thackeray)  असणारं प्रेम, या दोन्हीप्रति असणारी निष्ठा, त्या दोघांचं गुरुशिष्याचं नातं हे सगळं मी जवळून बघितलं आहे ,अनुभवलं आहे. चित्रपटात या सर्व गोष्टी प्रभावीपणे मांडल्या आहेत. आजच्या पिढीला आनंद दिघे कळण्यासाठी सर्वांनी हा चित्रपट आवर्जुन बघावा असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

मंगेश देसाई (Mangesh Desai) आणि झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या, प्रविण तरडे (Pravin Tarde) लिखित दिग्दर्शित धर्मवीर मुक्काम पोष्ट ठाणे या चित्रपटाला पहिल्या दिवसापासूनच हाऊसफुल्ल प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत या चित्रपटाने तब्बल ९.०८ कोटी कमाई केली आहे.